कल्याण-डोंबिवलीत निकृष्ट पद्धतीने काम सुरू असल्याच्या तक्रारी

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांवर पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३० हजार एलईडी दिवे लावण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू केले आहे. या दिव्यांमुळे रस्त्यांवर उजेड पडण्याऐवजी अंधूक प्रकाश पडत असल्याच्या तक्रारी स्मार्ट सिटी विभागाकडे येत आहेत. एलईडी दिव्याच्या कामांचा ठेका देताना त्यामधील अटी-शर्तीचे पालन न करता ही कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे ही कामे सुरू असताना दिवे नादुरुस्त होण्याच्या प्रकाराबाबत तक्रारी वाढत आहेत.

एलईडी दिव्यांमुळे रस्त्यांवर उजेड पडले आणि ऊर्जा बचत व वीज देयक खर्चाची बचत होईल या उद्देशातून स्मार्ट सिटी प्रकल्पातून ३० हजार एलईडी दिवे डोंबिवली, कल्याणमध्ये बसविण्यात येणार आहेत. सुमारे ४५ कोटी रुपयांचा हा ठेका आहे. हे दिवे बसविल्यानंतर पुढील १० ते १५ वर्षे हे दिवे सुस्थितीत असणे आवश्यक आहे, असे शहरातील विद्युत व इतर क्षेत्रातील जाणकार रहिवाशांचे म्हणणे आहे.

एलईडी दिवे बसविण्यापूर्वीच ते नादुरुस्त होत असतील तर प्रशासनाने तातडीने हे काम थांबवावे, अशी मागणी विविध स्तरातून पालिकेकडे होत आहे. ही कामे करणाऱ्या कामगारांनीच ही माहिती काही जाणकार रहिवाशांना दिली आहे. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांवर अनेक वर्षांपासून सोडियम व्हेपर दिवे आहेत. या दिव्यांचा लख्ख प्रकाश रस्त्यांवर पडतो. नव्याने बसविण्यात आलेले एलईडी दिव्यांचा रस्त्यांवर अंधूक प्रकाश पडतो, असे अनेक वाहन चालकांनी सांगितले. एलईडी दिव्यांचा अंधूक प्रकाश पुढील काळात अपघात आणि इतर अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असून याकडे आयुक्तांनी लक्ष घालून या कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. दिवे बसविण्याची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत. ३० हजार दिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या तर केलेला सर्व खर्च फुकट जाण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. वीज दिव्यांच्या खांबांची उंची किती असावी. त्यांचा किती प्रकाश रस्ता परीघ क्षेत्रात पडेल याचा विचार करून दिवे बसविणे गरजेचे आहे. परंतु सध्या सरसकट हे दिवे बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

३० हजार एलईडी दिव्यांपैकी ११ हजार दिवे विविध रस्त्यांवर बसवून झाले आहेत. अतिशय योग्य  रीतीने हे दिवे बसविले आहेत. निविदेतील अटीशर्तीच्या अधीन राहूनच ठेकेदार ते काम करीत आहे. या दिव्यांमुळे रस्त्यांवर मंद प्रकाश पडतो, अशा अनेक तक्रारी येत आहेत. त्याचे निराकरण केले जाते. रस्त्याचे अंतर, दिव्याच्या प्रकाशाचा परीघ विचार करून दिवे बसविण्यात येत आहेत. या कामात अनियमिता नाही.

– तरुण जुनेजा, प्रकल्प प्रमुख, स्मार्ट सिटी प्रकल्प