काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी जास्त जागा तसेच महत्त्वाच्या प्रभागांवर दावा केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची शक्यता मावळली आहे. काँग्रेसने याचे सारे खापर राष्ट्रवादीवर फोडले आहे.

आघाडीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या गांधी भवन मुख्यालयात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. आघाडी करण्याची आमची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगतानाच दोन-चार जागांवर पुढे-मागे होऊ शकते, असे संकेत दिले होते. आघाडीसाठी राष्ट्रवादी ताणून धरणार नाही, असे तटकरे यांनी गुरुवारी चर्चेच्या पूर्वी सांगितले होते. प्रत्यक्षात दोन्ही बाजूने ताणले गेल्याने आघाडीचा घोळ झाला आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे आघाडी होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली असून, काँग्रेसने स्वबळाची तयारी केल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीच्या वतीने वाटाघाटींमध्ये ६७ प्रभागांवर दावा करण्यात आला. तसेच काँग्रेसचे उमेदवार विजयी होऊ शकतात किंवा यापूर्वी निवडून आले आहेत, अशा प्रभागांवरही दावा करण्यात आला. राष्ट्रवादीने दावा केलेले प्रभाग सोडण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार दिला. समविचारी मतांचे विभाजन होऊ नये हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण अवास्तव जागांची राष्ट्रवादीची मागणी मान्य करता येणार नाही, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. शेवटचा प्रयत्न म्हणून दोन्ही प्रदेशाध्यक्षांची बैठक व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.