भाजपला टाळण्यासाठी काँग्रेसचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा
अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्षपदी मनीषा वाळेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदीही शिवसेनेच्याच अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत काँग्रेसकडे हे पद जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अखेर पालिकेतील दोन्ही पदांवर शिवसेनेच्याच नगरसेवकांची वर्णी लागली आहे. भाजपच्या घोडेबाजाराला रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.
बदलापूरप्रमाणे अंबरनाथ नगरपालिकेत नगराध्यक्षपदी बिनविरोध उमेदवार दिल्यानंतर शिवसेना उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लावते याबाबत संभ्रम होता. त्यात भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्याची घोषणा केल्याने शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते.
\त्यामुळे भाजपच्या हाती आलेले उपनगराध्यक्षपद जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या वाटय़ाला उपनगराध्यक्षपद दिले जाईल, असे बोलले जात होते.
शिवसेनेसोबत उपनगराध्यक्षपद काँग्रेसला मिळणार हे जवळपास निश्चितही झाले होते. मात्र भाजप आणि काँग्रेस यांना विभागून हे पद देण्याला काँग्रेसचा विरोध होता. त्यामुळे काँग्रेसने उपनगराध्यक्षपदाला नकार दिल्याचे कळते आहे.
ऐनवेळी शिवसेनेचे अब्दुल शेख यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी अब्दुल शेख यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
घोडेबाजार रोखण्यासाठी..
काँग्रेसच्या खेळीमुळे भाजपला सत्तेत जाण्यापासून रोखण्यात काँग्रेसला यश आले. मात्र घोडेबाजार रोखण्यासाठीच शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे काँग्रेस गटनेते प्रदीप पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बदलापूरप्रमाणे अंबरनाथमध्येही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच नगरसेवकांची वर्णी लागली.