गेल्या दोन दिवसांपासून शहरात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असली तरी पुढील आठ दिवसांत होणाऱ्या रुग्णवाढीवर आणि नागरिक नियम पाळत नसतील तर टाळेबंदीसारख्या निर्बंधाचा विचार करण्यात येईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध तूर्तास लागू करण्यात आले नसले तरी जुन्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत ग्लोबल कोविड रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. माजिवाडा भागातील वाहनतळामध्ये उभारण्यात आलेले रुग्णालय फेब्रुवारी अखेपर्यंत सुरू होईल. तसेच आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये अधिकृत करण्यात येणार आहेत. रुग्णवाहिकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.

ताप, सर्दीच्या रुग्णांची करोना तपासणी करणे सक्तीचे केले असून तशा सूचना दवाखान्यांना देण्यात आल्या आहेत. मुखपट्टीविना फिरणारे तसेच सामाजिक अंतराचा नियम पाळत नाहीत, अशांवर पोलिसांच्या मदतीने दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, लग्न समारंभ, क्लब याठिकाणी नियमांचे पालन झाले नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.