नालासोपाऱ्यात सीताराम मार्केटमधील प्रकार ध्वनिचित्रफितीद्वारे उघड

वसई-विरार भागातून विविध प्रकारच्या घटना समोर येत असतानाच पुन्हा एकदा नालासोपारा येथील सीताराम मार्केट परिसरात असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर पदार्थ तयार करण्यासाठी शौचालयातील नळाद्वारे येणाऱ्या दूषित  पाण्याचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

नालासोपारा पूर्व भागात सीताराम बाप्पा मार्केट परिसर आहे. या परिसरात वडापाव, चायनीज, पाणीपुरी, नुडल्स अशा विविध प्रकारचे पदार्थांची विक्री करणाऱ्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लावण्यात आल्या आहेत. या गाडय़ांवर शाळकरी मुले, रिक्षाचालक येतअसतात. मात्र या गाडय़ांवर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी शौचालयातील दूषित पाणी वापरले जात असल्याची ध्वनिचित्रफित मयंक रावत या जागरूक नागरिकाने तयार केली. नंतर ती  समाजमाध्यमावर प्रसारित केली.  यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवडय़ात नालासोपारा येथील सेन्ट्रल पार्क येथे दूषित पाण्यात भाजीपाला ठेवण्यात आल्याची घटना घडली होती, तर याआधी इडलीसाठी दूषित पाणी, फळांसाठी रसायन लावून पिकविणे, दूषित शीतपेय असे अनेक विविध प्रकार उघडकीस आले होते. या प्रकारानंतर ठिकठिकाणी याची तपासणी         करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने खाद्यपदार्थांची विक्री करणारे सर्रासपणे दुषित पाण्याचा वापर करून अशा प्रकारचे पदार्थांची विक्री करू लागले आहेत.

शहराचे वाढते नागरीकरण त्याच बरोबर बेसुमार पणे फेरीवाल्यांची वाढलेली संख्या यामुळे विविध ठिकाणी फेरीवाले  खाद्य्पदार्थांची ठाण मांडून बसू लागले आहेत. मोठय़ा संख्येने नागरिक या विक्रेत्याकडून खाद्य्पदार्थ खरेदी करून खाल्ले जात आहेत.

पंरतु हे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे पाणी कोणत्या ठिकाणाहून आणले जात असल्याचे नागरिकांना माहिती नसल्याने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या खाद्यपदार्थ विक्री, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ध्वनिचित्रफितीची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. त्यानुसार आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यावर संबधित विभागाशी पत्रव्यवहार करून कारवाई करण्यात येईल.     -डी. एस. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुळींज पोलीस ठाणे   

तपासणीसाठी पथकच नाही

शहरात विविध ठिकाणी दूषित खाद्यपदार्थ व शीतपेय विक्री होत असल्याचे समोर येत असतानाच यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार होते मात्र अद्यपही या पथक तयार करण्यात आले नसल्याने या पदार्थाची सर्रास विक्री होऊ  लागली आहे.

ज्या ठिकाणी दुषित पाण्याचा वापर करून पदार्थ विक्री करीत आहेत त्या ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून तपासणी करून कारवाई करण्यात येईल.    – बी. जी. पवार, आयुक्त वसई विरार पालिका.