अर्धवट पत्ते, चुकीच्या भ्रमणध्वनींमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका गोंधळात

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

कल्याण : करोना आजाराची लक्षणे दिसत असतानाही केवळ विलगीकरण केंद्रात दाखल होण्याच्या भीतीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात अनेक रुग्ण चाचणीसाठी पुढाकार घेत नसल्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये रुग्ण शोध मोहिमेचा अक्षरश फज्जा उडाल्याचे चित्र आहे. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी असे आजार असले तरी भिवंडीजवळील टाटा आमंत्रा अलगीकरण केंद्रात जावे लागेल तसेच निदान करण्यास सांगितले तर तीन हजार रुपये आणायचे कोठून, असे प्रश्न आजही अनेक कुटुंबांकडून उपस्थित होताना दिसत आहेत. याशिवाय शहरात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध नसल्यामुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महत्त्वाचे म्हणजे नागरिकांकडून असहकाराच्या बातम्या सातत्याने पुढे येत असतानाही कल्याण-डोंबिवलीचा दररोजचा आकडा सहाशेच्या आसपास जात आहे. नियमित घरोघर चाचण्या सुरू केल्या तर हा आकडा मोठी झेप घेण्याची भीती वर्तवली जात आहे. पालिकेच्या आणि शासनाच्या रोजच्या करोना आकडय़ात १०० ते १२५ आकडय़ांची तफावत येत आहे. अशा रुग्णांचा पालिका आरोग्य केंद्रातील फिरत्या पथकाने शोध घेऊन त्यांची नाव, पत्ता, भ्रमणध्वनीसह माहिती वैद्यकीय विभागाला कळविली. त्यानंतर वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करणे, त्यांच्यावर उपचार किंवा त्यांच्या अलगीकरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी रुग्णांचा शोध सुरू केला तर हे रुग्ण हाती लागत नाहीत, अशा प्रशासनाच्या तक्रारी आहेत.

प्राथमिक फेरीत संशयित म्हणून आढळून आलेल्या या रुग्णांचा शोध नवीन वैद्यकीय शोध पथकाने सुरू केला की संबंधित रुग्णांनी दिलेले पत्ते अर्धवट आढळून येतात. माऊली चाळ, स्थानक मार्ग, खडेगोळवली, साईश्रद्धा चाळ, कोळसेवाडी, असे अर्धवट पत्ते रुग्ण, त्यांचे नातेवाईक देतात. अशा पत्त्यावरील रुग्णांनी आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांना दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर तो क्रमांक चुकीचा येतो. अन्य रहिवाशाचा तो क्रमांक असतो. दिवसभरात आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांनी १०० संशयित रुग्ण तपासले. त्यामधील ४० ते ५० रहिवासी चुकीचे पत्ते, चुकीचा भ्रमणध्वनी देऊन पालिकेची दिशाभूल करतात. असे रुग्ण शोधणे गरजेचे असल्याने त्यांना शोधण्यात पथकाचा निम्मा वेळ निघून जातो. अनेक वेळा अशा रुग्णांचे पत्ते सापडत नसल्याने शोध मोहीम थांबवावी लागते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

कर्मचाऱ्यांचा अभाव

महापालिका आरोग्य केंद्रात सर्वेक्षणासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. ज्या गतीने करोना संपर्क शोध मोहीम होणे आवश्यक आहे ती होत नाही. वैद्यकीय विभागातील अनुकंपा तत्त्वावरील जागांवर यापूर्वी कर्मचारी भरले पण ते अन्य विभागात दाखल करून घेण्यात आले. तेच कर्मचारी आता उपलब्ध असते तर पुरेसे मनुष्यबळ विभागाला उपलब्ध झाले असते, असे एका माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.