कौपिनेश्वर, अंबरनाथ शिवमंदिर दर्शनासाठी बंद; मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : जिल्ह्य़ातील शहरी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली असून यामुळे सण-उत्सवांवर पुन्हा करोनाचे सावट असल्याचे चित्र आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर आणि अंबरनाथचे शिवमंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. तर दरवर्षी मोठय़ा उत्साहात साजरी होणारी अंबरनाथच्या शिवमंदिरातील यात्राही यावेळी रद्द करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून ठाणे जिल्ह्य़ात करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात असेच चित्र होते. या महिन्यात दररोज सरासरी ३५० ते ४०० रुग्ण आढळत होते. मात्र, मार्च महिन्यात करोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे. आता दररोज सरासरी ५०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्ह्य़ाची चिंता वाढू लागली आहे. तसेच येत्या सण-उत्सवांवर करोनाचे सावट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सण-उत्सवासाठी होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा, पालिका आणि पोलीस यंत्रणेने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी व्यवस्थापनाला काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. या वृत्तास कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रवींद्र उत्तेकर यांनी दुजोरा दिला आहे.

करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता अंबरनाथ येथील प्राचीन शिवंमदिराची जत्रा यंदाच्या वर्षांत रद्द करण्यात आली आहे. शिवमंदिराचे विश्वस्त, मानकरी, पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांनी नुकताच मनाई आदेश काढला आहे. त्यानुसार शिवमंदिर परिसरात गर्दी, कार्यक्रम, धार्मिक सोहळे आणि मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे.

केवळ शिवरात्रीची पूजा

शिवमंदिराचे पुजारी, विश्वस्त आणि मानकरी यांच्याच उपस्थितीत शिवरात्रीची पूजा होणार आहे. १० मार्च ते ११ मार्च या कालावधीत कुणालाही येथे उपस्थित राहता येणार नाही. तसेच आसपास कोणतेही स्टॉल, तंबू, खेळणी, पाळणी लावता येणार नाहीत. पालखी, मानकरी दिंडय़ांनाही प्रवेश बंद केला आहे. या काळात शिवमंदिराच्या एक किलोमीटर परिसरात सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.