लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली गावची महाजत्रा म्हणून मागील १७ वर्षे प्रसिद्ध असलेला आगरी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय संयोजक आगरी युथ फोरमने घेतला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हा महोत्सव सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित केला जातो. आगरी महोत्सव करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन रद्द करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. राज्याच्या विविध भागातील लोकांचे आगरी महोत्सवाकडे दरवर्षी लक्ष लागून असते. १२ दिवसांच्या महोत्सवात सात ते आठ लाख रसिक रहिवाशी महोत्सवाला भेट देतात. यावर्षी करोना संसर्गाच्या भीतीने १८ वा महोत्सव रहिवाशांच्या सुरक्षितेतचा विचार करून रद्द करावा लागत आहे, असे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.

एका शैक्षणिक संस्थेच्या उभारणीच्या निधी संकलनासाठी हा महोत्सव सलग १७ वर्षे भरविण्यात येतो. आगरी महोत्सवाचे रुपडे गेल्या काही वर्षांपासून बदलण्यात आले आहे. आगरी, कोळी समाजासह उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय, दाक्षिणात्य मंडळी आवर्जून महोत्सवाला भेट देतात. रायगड, नाशिक, मुंबई, ठाणे, वसई, डहाणू याशिवाय विदर्भ, जळगाव, सोलापूर भागांतून रहिवासी महोत्सवाला भेट देतात. विविध प्रकारची उत्पादने, वस्तू, उत्पादक कंपन्या, महिला बचतगट त्यांनी तयार केलेली उत्पादने, कोकणातील जिन्नस, रानमेवा, वसई-विरार पट्टय़ातील चवीदार खारी सुकी मासळी यांची रेलचेल महोत्सवात १२ ते १५ दिवस असते. मनोरंजन, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, जिभेचे चोचले पुरविणारे रसरशीत मासे, मटण यांचे भोजन अशी साग्रसंगीत सुविधा महोत्सवात असल्याने कुटुंबीय आठवडय़ातून हटकून या ठिकाणी एक ते दोन वेळा भेट देतात. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत पास सुविधा देण्यात असल्याने शिक्षक, त्यांचे कुटुंबीय यांची उपस्थिती असते. आगरी, कोळी समाजाचे पारंपरिक जीवन, त्यांची जीवनशैली प्रतीकात्मक पद्धतीने महोत्सवात मांडण्यात येते.

ऑक्टोबपर्यंत करोना रुग्णांची संख्या कमी झाली तर बाहेरील परिस्थितीचा विचार करून महोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार होता. दिवाळीनंतर पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आगरी महोत्सव म्हणजे गर्दीचे ठिकाण. या ठिकाणी दररोज करोना संसर्गाचे नियम पाळून गर्दीवर आवर घालणे कठीण असल्याने आगरी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय महोत्सव समितीने घेतला आहे.

 – गुलाब वझे, अध्यक्ष, आगरी युथ फोरम