अनेक वर्षांचे नूतनीकरणाचे काम मार्गी; केंद्रीभूत प्राणवायू सुविधेसह कृत्रिम श्वसन यंत्रणेची उभारणी

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : भिवंडी आणि आसपासच्या ग्रामीण भागांतील लाखो रुग्णांसाठी एकमेव आशास्थान असलेले भिवंडी येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय करोनाच्या साथीत कात टाकू लागले आहे. करोनाच्या साथीमुळे या रुग्णालयाचा भाग्योदय झाला असून कधी नव्हे इतक्या मोठय़ा प्रमाणावर निधी येथे उपलब्ध होऊ लागल्यामुळे रुग्णालयाचे रूपडे पालटले आहे. कधी नव्हे ते येथे केंद्रीभूत प्राणवायू सुविधेसह नवी-कोरी अद्ययावत अशी कृत्रिम श्वसन यंत्रणाही उभी राहिली आहे.

भिवंडी शहरातील मध्यावर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा गेली अनेक वर्षे बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाची इमारत जुनी झाल्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी झिरपणे, भिंतीचे स्लॅब पडणे, फर्निचर नादुरुस्त अशा समस्या अगदी नित्याच्या होत्या. या रुग्णालयामध्ये केवळ चारच खाटांचा अतिदक्षता विभाग होता. त्यापैकी दोनच खाटांवर अतिदक्षता विभाग सुरू होता. त्यामुळे भिवंडी शहरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांना गंभीर उपचारासाठी मुंबई ठाण्यातील रुग्णालये गाठावी लागत होती.

भिवंडी शहरात जून महिन्यात करोनाची साथ झपाटय़ाने पसरली होती. त्यातच या रुग्णालयाची दुरवस्था असल्यामुळे शहरातील करोना रुग्णांचा भार ठाणे शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयावर येत होता. याविषयी सातत्याने ओरड सुरू होताच जिल्हा आरोग्य विभागाने कधी नव्हे ते भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. या वेळी रुग्णालयाचे गळके छत आणि भिंतींची डागडुजी करण्यात आली.

नादुरुस्त फर्निचर काढून टाकत त्या जागी नवीन फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले. करोनाकाळात रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची भासणारी आवश्यकता लक्षात घेऊन रुग्णालयातील १०० खाटांपैकी २० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. त्याचबरोबर सामान्य रुग्ण विभागातील ८० खाटांना केंद्रीभूत प्राणवायू व्यवस्थेशी जोडण्यात आले. तसेच रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांसह पुरेशा प्रमाणात डॉक्टर, परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णालयाचे बळकटीकरण झाले आहे. या रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनची टाकीही बसविण्यात येणार आहे.

रुग्णालयात ५० खाटांचा ‘नॉन कोविड विभाग’ सुरू

भिवंडी तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले होते. सध्या भिवंडी शहर आणि तालुक्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना शहरातच योग्य उपचार मिळावे यासाठी रुग्णालयाचे आणि तेथील कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे विभाजन करून रुग्णालयात ५० खाटांचा ‘नॉन कोविड विभाग’ सुरू करण्यात आला आहे. यामध्ये बाह्य़रुग्ण विभाग, अपघात विभाग आणि प्रसूती कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी इतरत्र भटकावे लागणार नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.