लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : सामाजिक अंतर पाळणे, मुखपट्टी वापरणे, गरज असेल तर घराबाहेर पडणे या सर्वाचे पालन केले तर येत्या दहा दिवसांत ठाणे शहरातून करोनाला हद्दपार करता येईल, अशा शब्दांत ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी नागरिकांना टाळेबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळाले नाही तर ही परिस्थिती नियंत्रणात येणार नाही व टाळेबंदी वाढून सर्वाचेच नुकसान होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठाणेकरांना संबोधित केले. शहरात साडेतीन हजार करोनाबाधित रुग्णांची संख्या असली तरी १३०० म्हणजेच ४५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. देश आणि राज्याच्या तुलनेत शहरात मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, असे सिंघल यांनी सांगितले. करोना आजाराला घाबरण्याची गरज नसून तो इतर आजारांप्रमाणेच एक आजार आहे. डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अन्य आजार आले आणि गेले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव शहरात असला तरी पुढील काळात सर्वाच्या साथीने त्याला हद्दपार करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शहरात ५० ठिकाणी ताप तपासणी केंद्र सुरू करण्यात आली असून एक हजार जणांचे पथक घरोघरी जाऊन हे काम करीत आहेत. आणखी पथक वाढविण्यात येणार असून ही पथके प्रतिबंधित क्षेत्रामध्येही जाऊन काम करणार आहेत, असे सिंघल म्हणाले.

आठ हजार खाटांचा दावा

शहरात ८८ रुग्णवाहिका उपलब्ध असून येत्या काही दिवसात शंभरहून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध होतील. शहरातील करोना रुग्णालयांमध्ये किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीही आता एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्णांसाठी ग्लोबल हब येथे एक हजार खाटांचे रुग्णालयाचे काम सुरू आहे. तसेच म्हाडा अंतर्गतही एक हजार खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. सद्यस्थितीत शहरात रुग्णांसाठी ८ हजार खाटा उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ताप, ऑक्सिजनची तपासणी

ठाणे शहरातून दररोज साडेतीन हजार नागरिक कामाला जात असून त्यामध्ये रुग्णालय, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांमुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे  या सर्वानी कामावर जाण्यापूर्वी ताप आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासून घ्यावे. जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल आणि कुटुंबाचीही काळजी घेता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

रुग्णालयात गर्दी नको

करोनाबाधित रुग्ण आढळून येतात. त्यापैकी अनेकांत लक्षणे दिसून येत नाही. अशा रुग्णांच्या घरात स्वतंत्र खोली आणि शौचालयाची व्यवस्था असेल तर त्यांनी घरातच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायला हवेत. असे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तर त्याठिकाणी रुग्णांची गर्दी वाढेल. त्यामुळे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होण्याची गरज असलेल्या करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळणार नाही, असे मतही आयुक्तांनी मांडले.