कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील महिला, पुरुष वृद्धांची फसवणूक करून दागिने लंपास करणाऱ्या गुजरातमधील एका चोरटय़ाला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे तीन महिन्यांची साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. रोख रक्कम न भरल्यास आणखी पाच दिवस आरोपीला कैदेत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांनी या खटल्याविषयी माहिती देताना सांगितले, दोन वर्षांपूर्वी कल्याण, डोंबिवली परिसरातील वृद्धांना हेरून विनोदप्रसाद मुकेशप्रसाद शाह (४८) हा चोर त्यांच्या घरात प्रवेश मिळवीत होता. घरातील जुनी भांडी, दागिने चकचकीत करून देतो, असे सांगून तो वृद्ध मंडळींकडून जुने सोने, चांदीचे दागिने हट्टाने मागवून घ्यायचा. घरात कोणी तरुण, माहीतगार व्यक्ती नाही याची तो खात्री करून मगच त्या घरात ठाण मांडून बसायचा. एका बादलीत पाणी घेऊन त्यात रसायन टाकून फेस करायचा. घरमालकाने दिलेले दागिने, जुनी चांदीची भांडी बादलीत टाकून ती विघळवत बसायचा. हे काम सुरू असताना वृद्ध घरमालक, मालकिणीला घरातून गरम पाणी करून आणा. घासलेले दागिने गॅस पेटवून त्यावर काही वेळ तापवत ठेवा, अशा सूचना करायचा. या गोड बोलण्यातून तो मालकाची नजर चुकवून बादलीत टाकलेले अस्सल धातूचे दागिने हळूच स्वत:जवळील पिशवीत टाकून पिशवीतील त्याच पद्धतीचे बनावट दागिने बादलीतील फेसात टाकायचा. अर्धा तास हा कार्यक्रम केला की केलेल्या कामाचे पैसे घेऊन विनोदप्रसाद निघून जायाचा. तोपर्यंत आपली फसवणूक झाली आहे याचा कोणताही संशय वृद्धांना यायचा नाही. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत घासलेले दागिने हळूहळू काळे पडलेले दिसायचे. त्या वेळी घरमालकाला आपणास घरात आलेल्या कारागिराने फसविले याची जाणीव होत होती. अशा प्रकारे मागील तीन ते चार वर्षांत आरोपी विनोदप्रसादने १३ घरमालकांना फसविले होते. याप्रकरणी कल्याण परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत अशा प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल होते.

अशा प्रकारची फसवणूक करणारी व्यक्ती एकच असावी असा ठोकताळा मांडून कल्याण पोलीस उपायुक्तांच्या दरोडाविरोधी पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून विनोदप्रसादला गुजरातमधील नाडीयाद भागातून अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्यची कबुली दिली. पथकाने या प्रकरणाचा कसून तपास करून विनोदप्रसादवर कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

जामिनाला कडाडून विरोध

दरम्यानच्या काळात आरोपीने पाच वेळा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले होते. सरकार पक्षाने त्याच्या जामिनाला कडाडून विरोध केला होता. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यत न्यायालयाने विनोदप्रसादला जामीन मंजूर केला नव्हता. विनोदला त्याच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे असा चंग बांधून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. करोनाच्या काळातही त्याचे प्रकरण सुनावणीला आले होते. त्या वेळीही न्यायालयाने त्याला जामीन देण्यास विरोध केला होता. इतर गुन्ह्यत आरोपीला जामीन झाला होता, परंतु महात्मा फुले पोलीस ठाण्यातील गुन्ह्य़ात त्याला जामीन मंजूर होत नव्हता. न्यायालयाने आरोपी आणि सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन विनोदप्रसादला शिक्षा ठोठावली, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांनी दिली.