ठाणे / डोंबिवली : गौरीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता दरवर्षी बाजारपेठांमध्ये एक ते दोन दिवस अगोदर ग्राहकांची झुंबड पाहायला मिळते. मात्र, यंदा करोनाचे सावट असल्यामुळे आणि त्यातच पूजेच्या साहित्याचे दर वधारल्यामुळे गौरीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत असून यंदा या साहित्याच्या मागणीत ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

मुंबई, ठाणे तसेच उपनगरामधील बाजारपेठांमध्ये दरवर्षी गौरीच्या सणानिमित्त खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असते. गौरीपूजनाला काहीजण तेरडय़ाच्या फुलांची तर काहीजण मुखवटय़ांच्या गौरीला दागिन्यांनी सजवून त्याची पूजा करतात. त्यामुळे गौरीला सजविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, साडय़ा, सूप आणि विविध आकारांचे मुखवटे खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहक गर्दी करतात. यंदाच्या वर्षी करोनामुळे सर्वच सण उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला जात असल्याने सणउत्सवाच्या बाजारपेठांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदा गौरीपूजनही साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी बाजारात गौरी सणासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे तसेच दागिने आणि साडय़ा विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी करोनामुळे दागिन्यांमध्ये तसेच गौरीच्या मुखवटय़ात कोणतीही नावीन्यता दिसून आलेली नाही. तसेच करोनामुळे या साहित्याची आवकही बाजारात कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे या साहित्याच्या किमतीही वधारल्या आहेत. गौरीच्या पूजेसाठी सुपाचा वापर केला जातो. यंदा मालाची आवक कमी झाल्याने या सुपाच्या किमती ३० ते ४० रुपयांनी वाढल्या आहेत. तर १०० ते २५० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येणारा गौरीचा मुखवटा हा यंदा १५० ते ३५० रुपयांपर्यंत विकला जात आहे.