रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९१ टक्क्यांवर;  केवळ तीन टक्के बाधित उपचाराधीन

ठाणे : दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. शहरात केवळ तीन टक्क्य़ांच्या आसपास करोना रुग्ण आहेत. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्य़ांवर पोहचले आहे. तर मृत्युदर २.२८ टक्के इतका आहे. याशिवाय, रुग्ण दुपटीचा कालावधी २९९ दिवसांवर पोहचला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ५२ हजार १५७ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४९ हजार ५०५ (९४.९१ टक्के) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत १ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी मृत्यूचे प्रमाण २.३२ टक्के होते. ते आता कमी होऊन २.२८ टक्क्य़ांवर आले आहे. शहरात दररोज साडेपाच हजारांच्या आसपास चाचण्या होत असून त्यात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ७.४६ टक्क्य़ांवर आले आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.३८ टक्के इतके होते. शहरात सद्य:स्थितीत १ हजार ४६१ रुग्ण आहेत. त्याचे प्रमाण २. ८० टक्के इतके आहे. काही दिवसांपूर्वी हेच प्रमाण २.६४ टक्के इतके होते. काही दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी २९७ दिवसांचा होता. तो आता २९९ दिवसांवर आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रुग्णवाढीचा साप्ताहिक वेग ०.३० टक्के इतका होता. तो आता ०.२८ टक्क्य़ांवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

दिवाळीपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता. मात्र दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढली होती. या गर्दीमुळे शहरात पुन्हा करोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत होती. तसेच परदेशाप्रमाणेच शहरात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन यंत्रणा सज्ज केली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून शहरात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याचे चित्र आहे.

भिवंडीत चाचण्यांची संख्या वाढणार

उपजिल्हा रुग्णालयात नवीन प्रयोगशाळा

ठाणे : करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात चाचण्यांसाठी इतर शहरावर अवलंबूून राहणाऱ्या भिवंडी शहराला उशिरा का होईना स्वत:ची करोना चाचणी प्रयोगशाळा मिळाली आहे. शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून या ठिकाणी आता दररोज ३०० आरटीपीसीआर चाचण्या करणे शक्य होणार आहे. केवळ दीड महिन्यांच्या काळात ही सुसज्ज प्रयोगशाळा उभी करण्यात आली असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्याही प्राप्त झाल्या आहेत. या प्रयोगशाळेमुळे भिवंडीतील करोना चाचण्यांत वाढ होण्याची शक्यता असून अहवालही लवकर येण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून करोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली होती. त्या वेळी या भागांमध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्यामुळे करोना रुग्णांना उपचारासाठी ठाणे, मुंबई यांसारख्या शहरांत पाठवावे लागत होते. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी प्रयोगशाळा नसल्यामुळे चाचण्यांकरिता मुंबई शहरावर अवलंबून राहावे लागत होते. मे ते जुलै या कालावधीत मुंबईतील चाचण्यांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत असल्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्या बाधितांवर उपचार करण्यास तसेच रुग्णांचा शोध घेण्यास विलंब होत होता. त्यामुळे या कालावधीत भिवंडी शहरातील करोना मृतांचे प्रमाणही वाढले होते. या काळात जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून शहरातील संसर्ग काहीसा आटोक्यात आलेला दिसून आला. असे असले तरी शहरात आरटीपीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा नसल्यामुळे संशयितांच्या चाचण्या करण्यात अडचणी कायम होत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन राज्य शासनाच्या मदतीने शहरातील दीड महिन्यांपूर्वी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचण्यांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचे काम हाती घेतले. हे काम आता पूर्ण झाले असून प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्याही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रयोगशाळेत आता दररोज ३०० आरटीपीसीआर चाचण्या करता येणार आहेत. त्यासाठी १० ते १२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे. त्यामुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील संशयितांचा अहवाल तात्काळ मिळणे शक्य होणार आहे. सध्या भिवंडी शहरात दररोज आरटीपीसीआर आणि शीघ्र प्रतिजन मिळून ६०० चाचण्या होत आहेत. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यावर शहरातील चाचण्यांची संख्या ९०० पर्यंत पोहोचणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि साधनसामग्रीचा वापर करून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळा काही तांत्रिक बदल करून भविष्यात ती इतर साथरोगांच्या चाचण्यांकरिताही वापरता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रभाग समितीनिहाय साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग

प्रभाग         १६            ६

समिती       नोव्हेंबर डिसेंबर

माजिवाडा       ०.४%   ०.४ %

वर्तकनगर      ०.४ %  ०.३ %

उथळसर        ०.३ %  ०.२%

दिवा              ०.३ %  ०.२ %

कळवा           ०.४ %  ०.२ %

नौपाडा          ०.३%   ०.३%

लोकमान्य-

सावरकर        ०.३ %  ०.२%

वागळे

इस्टेट            ०.२ %  ०.२%

मुंब्रा              ०.१%   ०.१%