जेव्हा गुन्हय़ाचे प्रत्यक्ष पुरावे नसतात तेव्हा पोलिसांना ‘हय़ूमन इंटेलिजन्स’चा म्हणजे तर्काधारित तपास करावा लागतो. हे काम अतिशय कठीण आणि अनुभवाची कसोटी लावणारे असते. विरारच्या पेनिनसुएला पार्क येथे सापडलेल्या एका महिलेच्या हत्येचा तपास बंदच करावा लागणार होता. परंतु पोलिसांनी कसोशीने तपास केला, दुव्यांची साखळी जुळवली आणि हत्येचा उलगडा झाला.

विरार पश्चिमेच्या वाय.के. नगरजवळील पेनिनसुएला पार्कच्या निर्जन जागेतील खारटणात १८ एप्रिलच्या सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचे वय तीसच्या आसपास होते. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. तिची ओळख पटेल अशी कुठलाही गोष्ट नव्हती. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती तसेच हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करणयात आले होते. या महिलेच्या हत्येची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

स्थानिक पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. मारेकरी पकडण्यासाठी या महिलेची ओळख पटविणे आवश्यक होते. जेणेकरून पुढील तपास सोपा जाणार होता. परंतु या महिलेची काहीच ओळख पटत नव्हती. पोलिसांनी वसई-विरारसह पालघर, ठाणे आणि मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात बेपत्ता महिलांच्या तक्रारींची पडताळणी केली. मात्र कुठेच मयत महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात या मयत महिलेची छायाचित्रे पाठवून शोध घेण्यात आला. परंतु काहीच तपास लागत नव्हता. ही महिला या परिसरात राहणारी नव्हती. पोलिसांचा तपास खुंटण्याची शक्यता निर्माण झाली होती. ज्या परिसरात तिचा मृतदेह सापडलेला होता तो निर्जन आणि खारटणाचा भाग होता. यशवंतनगरजवळील पेनिनसुएला पार्कजवळचा हा परिसर. नव्याने विकसित झाला होता. खारटण असल्याने उजाड होता. परिसरात सीसीटीव्ही फुटेज नव्हते. महिलेची ओळख पटत नव्हती. काय करायचे, असा पोलिसांपुढे प्रश्न होता. खबऱ्यांना कामाला लावले होते. तरी काही सुगावा मिळत नव्हता. मग पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि हय़ुमन इंटेलिजन्स स्किलचा अधिक वापर करण्याचे ठरवले. यात खूप संयम बाळगावा लागतो आणि खूप मेहनत करावी लागते. हत्या रात्रीच्या वेळी झाल्याचे शवविच्छेदन अहवालात आले होते. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी विरार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. प्रचंड गर्दीच्या स्थानकातून असे फुटेज तपासणे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखे होते.

पोलिसांचे पथक सीसीटीव्ही तपासण्याच्या कामात गुंतले. पेनिनसुएला पार्कचा परिसर स्थानकापासून लांब होता. तिथे जाणाऱ्या व्यक्तीला वाहनानेच यावे लागले असते. त्यामुळे रिक्षात कुणी बसतंय का, हे पोलिसांनी तपासायला सुरुवात केली. खूप प्रयत्नांनंतर त्यांना एक जोडपे रिक्षात बसताना दिसले. फुटेज फारसे स्पष्ट नव्हते. पण हे तेच जोडपे असावे, असा तर्क पोलिसांनी लावला आणि तपास सुरू केला. विरार स्थानकातील सर्व रिक्षाचालकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या वेळी रिक्षात बसणारे जोडपे कोण होते.. चौकशी करता करता एका रिक्षाचालकाने पोलिसांना माहिती दिली. १७ एप्रिलच्या मध्यरात्री एक जोडपे रिक्षात बसले होते आणि त्या जोडप्याला पेनिनसुएला पार्कमध्ये सोडले होते. त्या महिलेसोबत असणाऱ्या पुरुषानेच हत्या केली होती हे स्पष्ट होऊ  लागले होते. पण तो पुरुष कोण? त्याला शोधायचे कसे? मग पोलिसांनी पुन्हा खबऱ्यांना कामाला लावले. एकाने माहिती दिली.. त्या निर्जन परिसरात ‘मौजमजा’ करण्यासाठी जोडपी येतात. पोलिसांकडे दुव्याची साखळी तयार होऊ  लागली होती. त्या महिलेला मौजमजा करण्यासाठीच त्या जागेवर आणले असावे आणि तिची हत्या करण्यात आली असावी. कारण एवढय़ा मध्यरात्री याच कारणासाठी त्या महिलेला तेथे नेले असावे. पोलिसांनी त्या रिक्षावाल्याकडे पुन्हा चौकशी केली. तेव्हा ते रिक्षात बंगाली बोलत होते असे समजले. या बंगाली भाषेचा दुवा निर्णायक ठरला.

आता पोलिसांपुढे चित्र स्पष्ट होऊ  लागले होते. आरोपी आणि महिला बंगाली बोलत होते म्हणजे ती महिला देहविक्री करणाऱ्या पेशातील असावी, असा पोलिसांनी कयास लावला. आरोपी निर्जनस्थळी घेऊन आला होता म्हणजे तो यापूर्वीदेखील येत असावा, असा विचार करीत पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले. या परिसरातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजवरून त्या इसमाचे छायाचित्र बनवले आणि त्याचा शोध सुरू केला. बंगाली बोलणारी व्यक्ती होती. असे लोक हॉटेलात आणि मजूर म्हणून काम करतात. त्या सर्व ठिकाणी तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. विरार डोंगरपाडा येथील अब्दुला ऊर्फ शेकन समद शेख (४३) याचे नाव या सगळय़ा दुव्यांतून पुढे आले. पोलिसांनी अब्दुलाला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.

आरोपी अब्दुला हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्या नावावर यापूर्वी दोन गुन्हय़ांची नोंद आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. १७ एप्रिलच्या रात्री तो विरार स्थानकात मद्यपान करण्यासाठी आला होता. त्या वेळी ही देहविक्री करणारी महिला त्याला भेटली. तिच्यासोबत त्याने एक हजार रुपयांचा एका रात्रीचा सौदा ठरवला आणि रिक्षात बसून निघाला. आपण एका मृत्यूशी सौदा करीत आहोत याची त्या वेळी तिला पुसटशी कल्पनाही नसेल. तिला लॉजवर नेण्याऐवजी अब्दुलाने तिला या पेनिनसुएला पार्कच्या निर्जन जागेत आणले. तेथे तिच्याशी संबंध ठेवले आणि तिला केवळ चारशे रुपये दिले आणि पुन्हा संबंधांची मागणी केली. ती पूर्ण पैशांसाठी हट्ट धरून बसली होती. त्यात वाद झाला. तिने कुणाला तरी फोन लावण्यासाठी मोबाइल काढला. परंतु अब्दुलाने तिचा फोन काढून खाडीत फेकला. तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. तिची बॅग घेतली आणि तिथून निघून गेला. पोलीस आपल्याला कधीच पकडू शकणार नाहीत, असा त्याचा समज होता. परंतु अर्नाळा पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हय़ुमन इंटेलिजन्सच्या आधारे या अशक्यप्राय वाटणाऱ्या हत्येचा छडा लावून आरोपीला अटक केली. अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे, पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास करून या गूढ हत्येची उकल केली.