बॅँका आणि सुपर मार्केटमध्ये रांगा, सामान खरेदीची लगबग

विरार : वसई-विरारमध्ये महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत जाहीर केलेल्या कडक निर्बंधाने सामान्य नागरिकांच्या मनात टाळेबंदीची भीती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी किराणा सामान घेण्यास मोठी गर्दी केली आहे, तर दुसरीकडे रोकड काढण्यासाठीसुद्धा एटीम सेंटरच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. एकीकडे शासन गर्दी न करण्याचे आवाहन करत असताना मूलभूत वस्तूंसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत असल्याने करोना प्रसाराची भीती अधिक वाढली आहे.

वसई-विरारमध्ये करोना दुसऱ्या लाटेने चांगलेच पाय पसरले आहेत. शहरात दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण मिळत असल्याने प्रशासनाबरोबर नागरिकांच्या  चिंता सुद्धा वाढल्या आहेत. त्यात अचानक लागू केलेल्या अघोषित टाळेबंदीमुळे पुन्हा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे भयभीत झालेले नागरिक अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याकरिता जीव धोक्यात घालून गर्दीचा भाग बनत आहेत. यामुळे करोना प्रसाराची भीती वाढली आहे.

विरारमधील रहिवाशी मनोज जोगदंड यांनी सांगितले की, शासनाने शनिवार रविवार संचारबंदी लागू केल्याने या दिवशी घरच्या बाहेर पडता येणार नाही, यामुळे कामावर जाणाऱ्यांना कोणताही पर्याय उरला नाही. यामुळे आम्ही सुट्टी टाकून घराचा किराणा भरण्यासाठी सकाळी ८ वाजल्यासून रांगेत उभे आहोत. रांगेत उभे राहताना भीती वाटते पण करणार काय? सर्वच बंद झाले तर उपाशी मरणार काय असा संतप्त सवाल त्यांनी शासनाला विचारला. मनवेल पाडा येथील रहिवासी किशोर पुसाळकर यांनी सांगितले की, आम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकत नाही. सरकार कधी संपूर्ण बंदी आणेल याचा भरवसा नाही. अनेक ठिकाणी एटीम सेंटरमध्ये पैसेसुद्धा नाहीत. उद्या आणखी परिस्थिती गंभीर झाल्यावर काय करणार  म्हणून ज्या एटीम मध्ये पैसे निघतात त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी तासन्तास उभे राहावे लागत आहे.

एकूणच शहरातील नागरिकांच्या मनात पुन्हा टाळेबंदीची भीती निर्माण झाली आहे. मागील टाळेबंदीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शेकडो उद्योगधंदे बंद पडले, अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांची गाडी आता कुठे रुळावर आली असताना पुन्हा कडक निर्बंधाने घसरली आहे. यामुळे पुन्हा टाळेबंदीझाली तर त्याचा सामना कसा करावा? अशी भीती निर्माण झाली आहे.