दहा दिवसांच्या टाळेबंदीच्या भीतीपोटी बाजारात गर्दी

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत गुरुवारपासून पुढील १० दिवस कठोर टाळेबंदी लागू होत आहे. या काळात घराबाहेर पडता येणार नाही या भीतीने रहिवासी खरेदीसाठी नेहमीपेक्षा अधिक संख्येने बुधवारी रस्त्यावर उतरले. सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी रहिवाशांनी रांगा लावल्या होत्या. पुढील ११ दिवस धंदा पूर्ण बंद राहणार या भीतीने सम-विषम तारखांच्या नियमांना वाकुल्या दाखवत काही दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती.

गुरुवारपासून सुरू होणारी टाळेबंदी कठोर असेल. बाजारात जाता येणार नाही. या भीतीने कपडे, किराणा दुकान, मोठी दुकानसंकुले, हार्डवेअर, मोबाइल दुरुस्ती, रिचार्ज करण्याची दुकाने ग्राहकांनी तुडुंब भरली होती. सामाजिक अंतराच्या नियमाचे कोठेही पालन केले जात नव्हते.

कल्याण रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवलीतील टिळक रस्ता, रेल्वे स्थानक भागातील गल्ल्यांमध्ये भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. शिळफाटा रस्त्यावरील दावडीचा बाजार, एमआयडीसीतील दुकान, भाजीपाला बाजारात किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतका भाजीपाला खरेदी केला जात होता. दोन्ही हातात सामान, भाजीच्या पिशव्या घेऊन रिक्षा पकडून तर काही पायी चालत घर गाठत होते. मेवामिठाईच्या दुकानदारांनी टाळेबंदी काळात दुकान उघडता येणार नसल्याने दूध, मलईचे पदार्थ खराब होणार असल्याने स्वस्त किमतीत विकण्यास सुरुवात केली होती. या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.   वाहन दुरुस्ती कार्यशाळांसमोर वाहने दुरुस्तीसाठी वाहनांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. पीठ गिरण्यांसमोर गहू, तांदूळ दळण्यासाठी आणि दळण तात्काळ मिळण्यासाठी रहिवासी गर्दी करून होते.

कठोर अंमलबजावणी करा

टाळेबंदी लागू केल्यानंतर त्यांची अंमलबजावणी कठोर झाली पाहिजे. एकही व्यक्ती रस्त्यावर दिसता कामा नये. बाजारपेठेत शिस्तीमध्ये पालिका नियमाप्रमाणे व्यवहार झाले पाहिजेत. असे कोठेही होताना दिसत नाही. आता तीन महिन्यांत पाच टाळेबंदी होऊनही करोना रुग्ण वाढले. सतत टाळेबंदी हा करोना साथ रोखण्यावरील कायम उपाय नाही. यासाठी पालिका, पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन टाळेबंदीची अंमलबजावणी केली पाहिजे. रस्त्यावर बेशिस्तपणे फिरणाऱ्या, वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, तरच टाळेबंदीचा उपयोग आहे. पालिकेने टाळेबंदी संदर्भातील नियम, माहिती लोकांसाठी प्रसारित केली पाहिजे, असे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.

टाळेबंदीने उपाशी मरायची वेळ!

पुन्हा टाळेबंदी लागू झाल्याने मागील तीन महिन्यांपासून आर्थिक चणचणीत असलेले रिक्षाचालक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. या सततच्या टाळेबंदीने उपाशी मरायची वेळ येईल. आता कोठे प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. तीही या टाळेबंदीने बंद करून रोजीरोटी बंद केली, अशी खंत अनेक रिक्षाचालकांनी व्यक्त केली.