मुंबई, ठाण्यातील नागरिकांची मुरबाडमधील केंद्रांवर गर्दी

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : लशींच्या तुटवडय़ामुळे शहरी भागातील अनेक ठिकाणी लसीकरण होत नसल्याने मुंबईसह ठाणे शहरांमधील नागरिकांनी ग्रामीण भागांकडे धाव घेतली आहे. सोमवारी मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील काही केंद्रांवर शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी त्यास आक्षेप घेऊन लसीकरण बंद करण्याची मागणी केल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

मुरबाड तालुक्यातील धसई, शिवळे, शेंद्रुण या लसीकरण केंद्रांवर मुंबई-ठाण्यातून आलेल्या नागरिकांनी रांग लावली होती. ग्रामस्थांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी लसीकरण थांबवण्याचा आग्रह धरला. धसई येथील केंद्रावर सोमवारी दुपापर्यंत लसीकरण केले गेले नव्हते. स्थानिक नागरिकांना लस मिळणे कठीण झाले असताना शहरांतून आलेल्या नागरिकांचे लसीकरण करू दिले जाणार नाही, अशी भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतल्याने या केंद्रांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

केंद्र सरकारने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी परवानगी दिल्यानंतर या वयोगटातील नागरिकांची नोंदणीसाठी संकेतस्थळांवर झुंबड उडाली. ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध तालुक्यांत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रांची नावे संकेतस्थळावर जाहीर केली होती. नियोजित वार, वेळ निवडून कुणीही कोणत्याही भागात जाऊन लस घेऊ  शकतो. मुंबई, ठाण्यातील अनेक लसीकरण केंद्रांवरील मोहीम लसमात्रांचा पुरेसा साठा नसल्याने विस्कळीत होती. त्यामुळे अनेकांनी ग्रामीण भागांमधील लसीकरण केंद्रे निवडली. यात ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील केंद्रांचा समावेश होता.

मुरबाड तालुक्यात धसई, शिवळे आणि शहापुरातील शेंद्रुण येथील आरोग्य केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच तेथे मुंबईसह आणि ठाणे शहरातून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती. टाळेबंदीमुळे एरवी शुकशुकाट असलेल्या धसईसारख्या गावात मुंबईतून आलेल्या नागरिकांच्या चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ वाजल्यापासून धसई आरोग्य वर्धिनी केंद्रात गर्दी झाली होती. गावात लसीकरणासाठी शहरी नागरिक आल्याचे कळताच ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. लोकप्रतिनिधींनी केंद्रांवरचे लसीकरणच बंद पाडले.

दरम्यान, शहरातल्या नागरिकांनी आपापल्या शहरातील, तालुक्यात आणि जिल्ह्यात लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात अजूनही लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसताना अशा प्रकारची बाहेरची गर्दी झाल्यास त्याचा ग्रामीण लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

ऑनलाइन नोंदणी करून जिल्ह्य़ाबाहेरील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. त्यास स्थानिकांनी आक्षेप घेतला. परिणामी, लसीकरण थांबवले होते. आरोग्य वर्धिणीबरोबरच शिवळे आणि शेंद्रुण येथील केंद्रांवरही गर्दी झाली होती.

– डॉ. नंदकुमार गोरडे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य वर्धिणी केंद्र

झाले काय?

लस तुटवडय़ामुळे मुंबई, ठाण्यातील काही ठिकाणी लसीकरण ठप्प झाले होते. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांनी कोविन संकेतस्थळावर नोंदणी करून लसीकरणासाठी मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील लसीकरण केंद्रे निवडली होती. सोमवारी या दोन तालुक्यांतील काही लसीकरण केंद्रांबाहेर चारचाकी गाडय़ा उभ्या असलेल्या स्थानिकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला.