वसंतनगरीतील रहिवाशांकडून संरक्षण भिंतीची मागणी

वसई : शहराच्या पूर्वेतील वसंतनगरी येथील भागात नैसर्गिक नाल्याच्या शेजारी संरक्षक भिंत बांधण्यात आली नसल्याने या नाल्याशेजारील बांधण्यात आलेल्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. एकीकडे या बांधकामांमुळे नाल्याचा प्रवाह अरुंद झाला असून त्यामुळे नाल्याचे पाणी थेट परिसरात शिरत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वसईच्या पूर्वेकडील बाजूस वसंत नगरी परिसर आहे. या परिसरातून सेक्टर क्रमांक एक व दोनच्या मागील बाजूस नैसर्गिक नाला असून त्यातून इमारतींचे सांडपाणी वाहून नेले जाते आहे. दरम्यान, पावसाळ्यात त्यातील प्रवाह वाढल्याने कडेला त्याचे तडाखे बसून इमारतीकडील काही भाग खचू लागला आहे. त्यामुळे येथील इमारतींना तडे जाऊ  लागले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

वर्षभरापूर्वी इमारतीजवळ नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत तयार करून नाला बंदिस्त करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच पावसाळ्यात एरवीपेक्षा अधिकचे पाणी या नाल्यातून वाहात आहे. तसेच ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते तेव्हा हा नाला तुडुंब भरून वाहत असतो. याचा परिणाम हा लगतच्या भागात असलेल्या इमारतींच्या पायावर होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पावसाळ्यापूर्वी या नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे व नाला बंदिस्त करणे गरजेचे होते, परंतु पालिका प्रशासनाकडून फक्त अश्वासने दिली जात असून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिक कला धपोला यांनी सांगितले आहे. या नाल्याच्या ठिकाणी नुकतीच पालिकेच्या वतीने नालेसफाई करण्यात आली, मात्र त्यामुळे कडेचा असलेला बराच भाग हळूहळू खचू लागला आहे. तसेच नाल्यातून घाणीच्या पाण्याचा निचरा होत असतो, पंरतु हा नाला बंदिस्त नसल्याने या नाल्यातून दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात पसरत असते. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

पुराचा धोका कायम

पावसाळ्यात या नाल्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहात असते. कधी कधी पाण्याची पातळी अधिक वाढली की, हे पाणी थेट इमारतीच्या परिसरात येत असते. मागील दोन वर्षांपासून निर्माण होत असलेल्या पुराचाही फटका येथील नागरिकांना बसला होता. यासाठी पालिकेने संरक्षण भिंत बांधून हा नाला बंदिस्त करावा अशी मागणी केली आहे. पण अद्यापही यावर उपाययोजना होत नसल्याने पुराचा धोका कायम आहे.

वसईपूर्वेतील नाल्याशेजारील भागात संरक्षण भिंत बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. परंतु करोनाच्या संकटामुळे त्यात अडचणी आल्या आहेत. लवकरच त्या कामाची पुढील प्रक्रिया पूर्ण करून काम पूर्ण केले जाईल.

– एकनाथ ठाकरे, सहायक अभियंता बांधकाम विभाग