29 May 2020

News Flash

कण्हेर खाडीपूल धोकादायक

२७ गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता

२७ गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता

वसई-विरारच्या वेशीवर असलेल्या २७ हून अधिक गावांना जोडणारा पूल धोकादायक बनल्याने या गावात ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. या गावात जाणारा एकमेव पूल अत्यंत जीर्ण आणि जर्जर झाला असूनही कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ  शकते.

विरार पूर्वेला कण्हेर खाडीवरील पूल हा एकमेव मार्ग आहे जो २७ गावे आणि पाडय़ांना जोडतो. हा पूल ३० वर्षांहून अधिक जुना आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची निर्मिती करून जिल्हा परिषदकडे सुपूर्द केला होता; पण आजतायागत या पुलाची डागडुजी झालेली नाही. जर हा पूल कोसळला तर या गावांचा संपूर्ण संपर्क तुटला जाईल. याशिवाय दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाळ्यामुळे या पुलाची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. या पुलाचे कठडे जीर्ण होऊन तुटले आहेत, तर खालच्या बाजूने या पुलाची अवस्था धोकादायक बनलेली आहे. या पुलाच्या सर्व सळया गंजून बाहेर पडल्या आहेत, तर सर्व ठिकाणच्या सिमेंटचा थर निघाला आहे. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळेल अशी अवस्था या पुलाची झाली आहे.

हा पूल धोकादायक असल्याचा फलक वसई-विरार महापालिकेने लावून आपली जबाबदारी झटकली आहे. या पुलावरून अवजड वाहने जाऊ  नये असे असतानाही या पुलावरून दिवसाला मोठय़ा प्रमाणात ट्रक रेती, दगड, खडक यांची वाहतूक करतात. यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ  शकते. तरी अशा वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही.

या पुलासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवले; पण त्यांच्या हाती निराशाच आली. या पुलावरून खर्डी, कण्हेर, कोशिंबे, वैतरणा, डोळावी, तांडलीपाडा, कोपरी अशा २७ अधिक छोटय़ामोठय़ा पाडय़ांना वाहतूक करावी लागते. या गावकऱ्यांना शहराशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. आम्ही याच पुलावरून धोकादायक प्रवास करत आहोत, मुलांना शाळेत घेऊन जाताना वा गावात रुग्णवाहिका आणताना मोठी भीती वाटते. लवकर जर हा पूल नाही बनविला तर मोठी दुर्घटना होऊ  शकते, असे स्थानिक रहिवासी बळीराम जाधव यांनी सांगितले. आधी हा पूल ग्रामपंचायतमध्ये होता. आता पालिकेच्या हद्दीत आहे; पण पालिकेने केवळ  फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनच एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण देत आहे, असे सुरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.

पालिकेने हा पूल धोकादायक असल्याचा फलक लावला आहे, तसेच या पुलावरून वाहतूक करण्यास मज्जाव केला आहे. सदरचा पूल हा महापालिकेकडे नसून जिल्हा परिषदेकडे आहे. या पुलाच्या दुरुस्तीबाबत आम्ही जिल्हा परिषदला सूचना दिल्या आहेत.     – राजेंद्र लाड, शहर अभियंता वसई विरार महापालिका

सदराचा पूल धोकादायक आहे म्हणून जिल्हा परिषदने नवीन पूल बांधण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी ९९ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर या पुलाचे काम सुरू केले जाईल.      – सुरेश शिंगान, शाखा अभियंता, जिल्हा परिषद पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2019 1:20 am

Web Title: dangerous bridge in virar mpg 94
Next Stories
1 नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
2 वसईतील समुद्र किनाऱ्यांची दुर्दशा
3 महिलांची सुरक्षा वाऱ्यावर
Just Now!
X