महापालिकेकडून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार

वसई-विरार शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने १९ धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार केले, परंतु संक्रमण शिबिरे नसल्याने त्यातील रहिवाशांना घरातून बाहेर काढता येत  नाही, त्यामुळे या रहिवाशांनाही या घरांमध्ये राहण्यावाचून पर्याय नाही. जीव मुठीत घेऊन या इमारतींमध्ये रहिवासी राहत आहेत. या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न पालिकेपुढे आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढत चालली आहे. या धोकादायक इमारतीवर नोटिसा बजावण्याचे काम पालिका प्रशासन करते. धोकादायक इमारतींवर कठोर कारवाई होत नसल्याने या इमारती कोसळण्याची घटना घडल्यानंतर शासन यंत्रणा जागी होते. यंदाच्या पावसाळ्याआधीसुद्धा पालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. परंतु तात्पुरता निवारा उपलब्ध नसल्याने त्या अजूनही रिकाम्या करण्यात आल्या नाहीत.  वसई-विरार महापालिका क्षेत्रात १५० धोकादायक इमारती आहेत. त्यात अतिधोकादायक १९ इमारती आहेत. जीव धोक्यात घालून त्यातील रहिवासी राहात आहेत, तर अतिधोकादायक म्हणजे कधीही कोसळण्याची शक्यता असलेल्या इमारतींत १५० च्या आसपास कुटुंबे राहत आहेत. पावसाळ्यात त्यांना खाली करणे आवश्यक होते. परंतु केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार करण्यात आले. सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना घडली नसल्याने पालिकेचे संकट एक प्रकारे टळले आहे.

संक्रमण शिबिरांची गरज

दरवर्षी पावसाळ्याआधी वसई-विरार महापालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना घरे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र महापालिकेच्या या पवित्र्यामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांची पंचायत होते. दुसरे घर घेण्याची ऐपत नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या वर्षीही पालिकेने अशीच मोहीम सुरू केली आहे. मात्र या इमारतीतून बाहेर काढण्यात येणाऱ्या रहिवाशांची पर्यायी सोय महापालिकेकडून करण्यात येत नाही. ट्रान्झिस्ट कॅम्पसारख्या पर्यायी निवाऱ्याचीही सोय नसल्याने आणि महापालिकेकडून होत असलेल्या सक्तीमुळे या इमारतींत राहणाऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.