नियम डावलून ५ ते ६ प्रवाशांची सर्रास वाहतूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार शहरातील रिक्षामधून नियम डावलून तीनऐवजी पाच प्रवाशांना बसवून वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने अपघात होण्याची शक्यता असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दावा केला असला तरी शहरात जागोजागी नियमबाह्य प्रवासी वाहतूक सुरू आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या वाढत असून रिक्षांचे प्रमाणही बेसुमार वाढले आहे. शासनाने रिक्षापरवाने खुले केल्याने रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र आजही हजारो अनधिकृत रिक्षा शहरात फिरत आहेत. या अनधिकृत रिक्षांमुळे वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण होत असतात. जास्त पैसे कमावण्यासाठी रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये भरतात. वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या सर्व भागांत अतिरिक्त प्रवासी भरले जात आहेत. जास्त प्रमाणात प्रवासी रिक्षात बसवल्याने अनेक अपघात घडले असून त्यात काही प्रवासी जखमीही झाले आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या नियमानुसार तीन प्रवासी आणि एक रिक्षाचालक अशा एकूण चार व्यक्ती रिक्षातून प्रवास करू शकतात, मात्र रिक्षामध्ये तीनऐवजी चार ते पाच प्रवासी भरले जात आहेत.

सर्वसामान्य प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे निमूटपणे रिक्षात बसावे लागते. मागे तीन प्रवासी आणि रिक्षाचालकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन प्रवासी बसवले जातात. रिक्षाचालक आणि त्यांच्या संघटना अतिरिक्त प्रवासी भरण्याच्या कृतीचे समर्थन करीत आहेत.

कारवाईचा दावा

बेकायदा प्रवासी तसेच विनापरवाना वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई सुरू असल्याचा दावा वसई वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी केला. शहरातील १ जानेवारी ते २० ऑगस्ट २०१८ दरम्यान ९,९५३ रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४५ लाख ५८ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिक्षाचालकांनी अतिरिक्त प्रवासी भरू नयेत यासाठी रिक्षा संघटनांची बैठक घेऊन माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आरटीओ’ची १५१ चालकांवर कारवाई

वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागानेही बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यांत १ हजार ५०७ वाहने तपासण्यात आली असून १५१ रिक्षाचालकांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही नियमाप्रमाणे रिक्षा चालवण्यास तयार आहोत; परंतु आम्हाला नियमाप्रमाणे भाडेही मिळाले पाहिजे. रिक्षा हे बेरोजगारांसाठी उपजीविकेचे साधन आहे. जास्त प्रवासी भरले तर बिघडले कुठे? आम्ही जास्त प्रवासी भरले नाहीत तर उपासमारीची वेळ येईल.

– विजय खेतले, अध्यक्ष, रिक्षाचालक-मालक महासंघ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous journey from passengers to rickshaw
First published on: 20-09-2018 at 02:09 IST