पोलिसांचा धाक नसल्याने खुलेआम मद्यपाटर्य़ा

बारा महिने तेरा काळ प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेल्या दिव्यातील नागरिकांसमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नवीन नाही. चार लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्याने अपप्रवृत्तींना पोलिसांचा अजिबात धाक नाही. याचाच फायदा घेत आता परिसरातील रस्त्यांलगत तळीरामांच्या मद्यपाटर्य़ा रंगू लागल्या आहेत.

दिवा परिसरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे देणे अद्याप शक्य झालेले नाही. पोलिसांची गस्त होत असली तरी त्यात नियमितपणा नाही. याचा फायदा आता तळीरामही घेऊ लागले आहेत. पोलिसांचा धाक नसल्याने येथील काही रस्त्यांलगत तरुणांची टोळकी जमून मद्यपान करताना दिसतात. नजीकच्या वाइन शॉपमधून मद्य घेऊन रस्त्यालगत पार्टी करत बसणाऱ्या या तरुणांना आसपासचे अजिबात भान नसते. रात्री दोन वाजेपर्यंत येथे अशा मद्यपाटर्य़ा सुरूच असतात. यादरम्यान, एकमेकांना शिवीगाळ करणे, भांडण करणे, मारहाण किंवा रस्त्यांवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांवर शेरेबाजी करणे असे प्रकार घडत असतात. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला होत आहे.

दिवा-शीळ फाटा रस्त्यावर असे अनेक अड्डे आहेत. या रस्त्यावर फारसे पथदिवे नाहीत. त्यामुळे रात्रीचा अंधार मद्यपींच्या पथ्यावर पडतो. रस्त्यावर दारू पिऊन ते तिथेच बाटल्या आणि खाद्यपदार्थाची वेष्टने टाकून देतात. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडते. बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या रस्त्यावर दारू पिणाऱ्यांची जत्राच भरते.

लवकरात लवकर या संदर्भात कारवाई केली जाईल. तसेच या रस्त्यात वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.

किशोर पासलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिवा-मुंब्रा विभाग.