कुख्यात आंतरराष्ट्रीय माफिया दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला आठ महिन्यांपूर्वी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली असतानाच आता त्यापाठोपाठ दाऊदचा हस्तक तारिक अब्दुल करीम परवीन (५१) याला पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंब्य्रात वीस वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी खून प्रकरणामध्ये तारिक हा फरारी असल्यामुळे मुंब्रा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. तारिकच्या अटकेमुळे ठाणे पोलिसांची ही दुसरी महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे.

मुंब्रा येथील किस्मत कॉलनी परिसरातील अब्दुला पटेल शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळच्या वेळेस मोहमद इब्राहिम बांगडीवाला आणि त्याचा मित्र परवेज अन्सारी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात रोशनआरा खान नावाची मुलगीही जखमी झाली होती. ३१ ऑगस्ट १९९८ साली ही घटना घडली होती. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खूनप्रकरणी सहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांची न्यायालयामध्ये पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली होती. मात्र, या गुन्ह्य़ामध्ये तारिक परवीन हा फरारी होता. मुंबई येथील एल.टी. मार्गाजवळील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये परवीन याने रियल इस्टेटचे कार्यालय थाटले होते.

याबाबत माहिती मिळताच ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मुंब्य्रातील दुहेरी खुनाची कबुली दिल्यामुळे खंडणीविरोधी पथकाने त्याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुंब्रा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली असून ठाणे न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

काय होते प्रकरण..

मुंब्रा येथील दौलतनगर भागात राहणारे महमंद उमर बांगडीवाला यांचा केबलचा व्यवसाय आहे. त्यांनी १९९० साली मुंबईमध्ये ईगल सॅटेलाइट नावाने केबल व्यवसाय सुरू केला होता. त्या वेळेस ते मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात राहत होते. महंमद शफी हाजी हसन, मेहबुब महंमदअली अरब, नासीर अहमद, शौकत शामसुद्दीन खिलजी हे त्यांचे व्यावसायिक भागीदार होते. काही कारणावरून त्यांचे भागीदारांसोबत वाद झाले होते. यातूनच महमंद यांचा भाऊ मोहमद इब्राहिम याने ‘भावाला काही झाले तर सोडणार नाही’, असे शफीला बजावले होते. त्यानंतरच मोहमद इब्राहिमची हत्या झाली होती. त्यामुळे त्याच्या हत्येप्रकरणी शौकत, महेबुब, महमंद हसन, अब्दुल हमीद, तारिक परवीन, फिरोज आणि जाफर कालिया यांच्यावर महमंद बांगडीवाला यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.