भाईंदर : उत्तनच्या समुद्रकिनाऱ्यावर सुमारे आठ फूट लांबीचा मृत डॉल्फिन मासा आढळून आला. बुधवारी सकाळच्या सुमारास हा मासा आढळून आल्यामुळे नागरिकांनी त्याला पाहण्याकरिता समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. भाईंदर पश्चिमेकडील उत्तन समुद्रकिनाऱ्याजवळ मोठय़ा प्रमाणात मासेमारी वर्ग वास्तव्य करत आहे. सकाळी कामानिमित्त किनाऱ्यावर गेलेल्या मच्छीमारांना मृत डॉल्फिन मासा दिसल्याने खळबळ उडाली. त्यानंतर वन विभागाला याची माहिती मिळाल्याने ते घटनास्थळी दाखल झाले.  साधारण आठ फूट लांब आणि सुमारे ४०० ते ५०० किलो वजनगटातील हा मासा असल्याचे समोर आले आहे. परंतु अद्यापही माशाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही आहे. भाईंदरच्या किनाऱ्यावर वर्षभरात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.