ऋषिकेश मुळे, पूर्वा साडविलकर

अधिकारी व्यग्र असल्याने छाटणीच्या कामांना विलंब; गेल्या १५ दिवसांत १६५ झाडे भुईसपाट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामांत अडकून पडल्याने दरवर्षी पावसाळय़ापूर्वी केल्या जाणाऱ्या शहरातील वृक्षछाटणीला यंदा उशिराने सुरुवात झाली आहे. धोकादायक वृक्षांची पाहणी करून त्यांच्या फांद्या छाटण्याची कामे पावसाळय़ापूर्वी करणे अपेक्षित असते. मात्र यंदा तसे न झाल्यामुळे जून महिन्याच्या १८ दिवसांत आतापर्यंत १६५ झाडे भुईसपाट झाली आहेत, तर १०८ हून अधिक फांद्या मोडून पडल्याचे समोर येत आहे.

मोसमी पावसाला अजून पूर्णपणे सुरुवात झाली नसली तरी गेल्या आठ-दहा दिवसांत ‘वायू’ वादळासोबत पाऊस व सोसाटय़ाचा वारा यांमुळे घोडबंदर, वागळे इस्टेट, कोपरी, नौपाडा या भागांसह शहरातील जुन्या ठाण्याच्या मध्यवर्ती परिसरांमध्ये झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. १ ते १८ जून या कालावधीत संपूर्ण शहरात १६५ झाडे उन्मळून पडली असून १०९ फांद्या मोडून रस्त्यावर पडल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. झाडे पडण्याच्या या घटनांमध्ये रस्त्यावरील वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तर रस्त्याच्या मधोमध झाडे पडल्याने काही भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

वर्षभरापूर्वी पाचपाखाडी भागात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अ‍ॅड. किशोर पवार यांच्या अंगावर झाड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. गेल्या आठवडय़ात गोखले मार्गावर पदपथाजवळील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ५० वर्षीय पादचाऱ्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. धोकादायक वृक्षांची छाटणी वेळेवर होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचा नागरिकांचा सूर आहे. धोकादायक वृक्षांची छाटणी पावसाळ्यापूर्वी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये करण्यात येते. यंदा ही छाटणी लांबणीवर पडल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या या वेळखाऊपणाचे कारण विचारले असता, एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणुकीची कामे असल्याने वृक्षछाटणीचे काम लांबणीवर पडल्याचे वृक्ष प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या मार्गावर धोकादायक झाडे

वागळे इस्टेट, कोरस मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हरिनिवास, पाचपाखाडी येथील आराधना टॉकीज मार्ग या भागातील झाडे ही रस्त्यांच्या दिशेने धोकादायक अवस्थेत वाकली आहेत. जोराचा पाऊस किंवा सोसाटय़ाच्या वाऱ्याने ही झाडे उन्मळून पडतील, अशी भीती आहे.

समतानगर येथील भागातही गेल्या तीन वर्षांपासून धोकादायक वृक्षांची छाटणी झाली नसल्याची ‘जाग’ या संस्थेचे सदस्य मिलिंद गायकवाड यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे धोकादायक वृक्षछाटणीस उशीर झाला. शहरातील धोकादायक वृक्षांची ताबडतोब छाटणी करण्यात येईल.

– अनुराधा बाबर, उपायुक्त- ठाणे महापालिका, वृक्ष प्राधिकरण