28 February 2021

News Flash

ठाणे जिल्ह्य़ातील पाणी वितरण व्यवस्थेचा बोजवारा

जिल्ह्य़ातील शहरी विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अपुरा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत मोरे

हजारो अनधिकृत नळजोडण्या, जुन्या वाहिन्यांमुळे होणारी गळती, सदोष वितरण पद्धत आदी कारणांमुळे ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. ही तूट नव्हे तर लूट असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. तर दुसरीकडे औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी पुरेशी प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने होणाऱ्या प्रदूषणामुळेही सुरळीत पाणीपुरवठय़ात अडचणी येत आहेत. पाणी व्यवस्थापनातील हे दोष दूर करण्याविषयी अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेली नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्य़ातील शहरी विभागातील लोकसंख्येच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच पाणी कपात केली जाते. जिल्ह्य़ात सर्वसाधारणपणे सरासरीइतका पाऊस पडतो. यंदाही पावसाने सरासरी गाठली. मात्र यंदा सप्टेंबरच्या मध्यावर पावसाने निरोप घेतला. त्यामुळे पाणीसाठय़ाचा वापर सप्टेंबर महिन्यापासूनच सुरू झाला. त्यात गेल्या काही वर्षांत शहरांची लोकसंख्या वाढल्याने संबंधित प्राधिकरणे त्यांच्या मंजूर कोटय़ापेक्षा अधिक पाणी उचलत आहेत. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पाणीसाठा आणि एकूण वापर यांचा कोणताही ताळमेळ बसत नसल्याने आढळून आले.

१५ जुलैपर्यंत पाणीसाठा शिल्लक राहील, या बेताने पाटबंधारे विभाग पाण्याचे नियोजन करतो. त्या नियोजनात ऑक्टोबर महिन्यातच २१ टक्के तूट येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून तातडीने आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात घेण्यात आलेल्या आढाव्यात तरीही १५ टक्के तूट येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता तातडीने पाणीकपात आणखी सहा तासांनी वाढविण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्य़ातील शहरी भागात दीड ते दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

२५ ते ३५ टक्के गळती

उपरोक्त विविध कारणांमुळे उपलब्ध पाणीसाठय़ातील सुमारे २५ ते ३५ टक्के पाणी सध्या वाया जात आहे. कठोर उपाययोजना केल्या तर गळतीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत आणता येऊ  शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी व्यवस्थापनातील त्रुटी दूर करणे ही संबंधित आस्थापनांची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. मात्र सध्या तरी या बाबतीत पूर्णपणे उदासीनता आहे.

५६ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट

मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी आणि पुणे जिल्ह्य़ातील टाटा कंपनीच्या आंदर धरणातून ठाणे जिल्ह्य़ास पाणीपुरवठा होतो. सध्या या दोन्ही धरणांमध्ये ३२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. विविध प्राधिकरणांकडून दरदिवशी १४०० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. त्यामुळे ५६ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट येत आहे. त्यामुळेच आठवडय़ात ३० तासांची पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:19 am

Web Title: deletion of water distribution system in thane district
Next Stories
1 बौद्ध स्तुपाचा विकास
2 पालिकेकडून कचऱ्याचे ‘एकीकरण’
3 चिकू उत्पादन निम्म्यावर
Just Now!
X