|| ऋषीकेश मुळे

सहा महिन्यांनंतरही महापालिकेच्या दोन केंद्रांची प्रतीक्षा

शारीरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात लांबलचक रांगांमध्ये तिष्ठत राहणाऱ्या अपंग व्यक्ती वा त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी महापालिकेची दोन केंद्रे सुरू करण्याची घोषणा ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली होती. मात्र, सहा महिन्यांनंतरही या प्रमाणपत्र केंद्रांचा पत्ताच नाही. त्यामुळे विविध शासकीय योजनांसाठी लागणारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अपंगांना आजही आबाळ सोसावी लागत आहे.

अपंगांसाठीच्या विविध योजना आणि सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. यापूर्वी हे प्रमाणपत्र केवळ शासकीय रुग्णालयांद्वारेच देण्यात येत असे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दर बुधवारी अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबविली जाते. सकाळी आठपासून जिल्ह्य़ाच्या विविध भागांतील अनेक अपंग व्यक्ती प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत ताटकळत असतात. गेल्या आठवडय़ात एका दिवशी १७६ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली. आठवडय़ात सरासरी १०० अपंगांना हे प्रमाणपत्र देण्याचा जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न असतो, मात्र अपंग व्यक्तींची संख्या मोठी असल्यामुळे जिल्हा रुग्णालयावर मोठा भार पडतो.

राज्यात सर्वच ठिकाणी अशा प्रकारे अपंग व्यक्तींना मनस्ताप सोसावा लागत असल्याने राज्य शासनाने मध्यंतरी नवीन आदेश काढत महापालिका रुग्णालयांतूनही अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्याचे सुचित केले. त्यानुसार ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात असा कक्ष तातडीने सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. जिल्हा रुणालयाच्या वतीने महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटपाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. असेच आणखी एक केंद्र वर्तकनगर येथील कोरस रुग्णालयातही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिनाभरात ही दोन्ही केंद्रे सुरू करा, असे आदेश आयुक्तांनी देऊन सहा महिने उलटले, तरीही ही केंद्रे सुरू करण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश आलेले नाही.

अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे..

शारीरिक अपंगत्व, खुटंलेली बौद्धिक वाढ, मंदत्व अथवा सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझमसारख्या अनेक आजारांच्या रुग्णांना अपंगत्वाचा दाखला घ्यावा लागतो. अपंग प्रमाणपत्र केंद्राद्वारे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना अर्ज करावा लागतो. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणेही गरजेचे असते. त्यानंतर अर्जदारास आवश्यक त्या शारीरिक चाचण्यांसाठी तारीख आणि वेळ देण्यात येते. या चाचण्यांनुसार ज्या व्यक्तींमध्ये ४० टक्कय़ांपेक्षा अधिक अपंगत्व असेल त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यक्तीला अपंगांसाठी असलेल्या शासकीय योजना आणि सोयीसुविधांचा लाभ घेता येतो.

काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटपाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मात्र अद्यापही ही सेवा सुरू झालेली नाही. जिल्हा रुणालयावर भार वाढत आहे. हे केंद्र सुरू झाल्यास अनेक अपंगांना प्रमाणपत्र मिळवणे शक्य होईल. महापालिकेने लवकरात लवकर ही केंद्र सुरू करावीत, असे निवेदन देण्यात आले आहे.     -डॉ. कैलाश पवार, शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय

अपंगांना प्रमाणपत्र देण्यासाठी कळवा रुग्णालय आणि कोरस रुग्णालयात जागा निश्चित करण्यात आली आहे. कागदपत्रांची पाहाणी कशी करावी आणि त्याची प्रक्रिया कशी असते याचे प्रशिक्षण घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक नाशिकला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर म्हणजेच डिसेंबर अखेपर्यंत प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू होईल.    –डॉ. आर. टी. केंद्रे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका