दुकानांबाहेरील गर्दी, धूम्रपान, थुंकण्याचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

ठाणे : ‘करोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, अशा सूचना असतानाही ठाण्यातील पानटपऱ्यांवर  गर्दी दिसून येत आहे. त्यातच या टपऱ्यांबाहेर धूम्रपान करणारे आणि तंबांखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्याचे प्रकार लक्षात घेऊन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यतील तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी सर्व दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच सार्वजानिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. याचाच एक भाग म्हणून करोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यत तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री बंद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यानी बुधवारी दिले. तंबाखू तसेच तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुकणे आणि धुम्रपान करणे यामुळे करोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने आणि पानटपऱ्यां बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणारी दुकाने आणि पानटपऱ्या बंद ठेवाव्यात अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था आणि संघटना आढळून आल्यास त्यांच्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

खाद्यठेल्यांवर गजबज

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख चौक, नाके आणि वस्त्यांमध्ये चहाची दुकाने तसेच पानटपऱ्या आहेत. या टपऱ्यांवर पान, सिगारेट किंवा तंबाखुजन्य पदार्थ घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत असतात. पान, सिगारेट किंवा तंबाखुजन्य पदार्थाची खरेदी केल्यानंतर अनेक जण त्याच ठिकाणी त्याचे सेवन करतात. त्यामुळे टपऱ्यांच्या परिसरात नागरिकांचे जथ्थे दिसून येतात. अशाच प्रकारे चहाच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येते. तसेच ठाणे शहरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेत विविध खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लागत असून त्या ठिकाणीही नागरिकांची गर्दी दिसत आहे.

‘ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांना गर्दी टाळण्याचे तसेच स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी आजही गर्दी होत असेल तर वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून त्याठिकाणी गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी,’ असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.