मेट्रोपोलीस प्रयोगशाळेत दिवसाला चारशेहून अधिक करोनाच्या तपासण्या; घरी जाणे टाळत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात पसरला असून त्याविरोधात लढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असून खासगी आरोग्य केंद्रातील डॉक्टरही या लढाईत उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून विद्याविहार येथील मेट्रोपोलीस वैद्यकीय प्रयोगशाळेतील डॉक्टर कुटुंबापासून दूर राहून सर्वसामान्यांच्या चाचण्या करत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सरकारने मेट्रोपोलीस या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेला मान्यता दिली आहे. या  प्रयोगशाळेत दिवसाला चारशेहून अधिक करोनाच्या तपासण्या करण्यात येत आहेत. या तपासण्या करताना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा संसर्ग आपल्यामुळे कुटुंबाला होऊ  नये यासाठी प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी कुटुंबापासूनच दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील निरंजन पाटील हे या प्रयोगशाळेत गेले काही वर्षांपासून डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी त्यांची कार्यालयीन वेळ नऊ  तास असायची. मात्र, देशावर आलेल्या करोना विषाणूच्या संकटामुळे ते सध्या १२ ते १३ तास काम करत आहेत. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून निरंजन हे घरी जायचे तेव्हा आपल्या कुटुंबापासून सामाजिक अंतर ठेवायचे. तसेच आपले कपडेसुद्धा ते स्वत: धुवायचे, असे निरंजन यांच्या पत्नी मोनाली पाटील यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन आठवडय़ांपासून कामाचा भार वाढू लागल्याने निरंजन यांना घरी येणे शक्य होत नाही. तसेच दिवसभर कामात असल्यामुळे त्यांच्यासोबत संपर्क साधणेही कठीण झाले असल्याचे मोनाली पाटील यांनी सांगितले. तर, दिव्यात राहणारे गौरव चव्हाण हेसुद्धा या प्रयोगशाळेत पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि त्यांची एक वर्षांची मुलगी आहे. या कामामुळे आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ  नये म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला मुलीसह काही दिवसांसाठी माहेरी राहण्यास पाठविले आहे. ते गेल्या दोन आठवडय़ांपासून पत्नी आणि मुलीपासून दूर आहेत.

कुटुंबाला संसर्गाची भीती

कुर्ला येथे  राहणारे अनिकेत परब हेसुद्धा या प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने गोळा करण्याच्या  विभागात काम करत आहेत. करोना संशयितांचे नमुने त्यांना हाताळावे लागत आहेत. ज्या दिवशी नमुने हाताळतात, त्या दिवशी ते घरी जात नाहीत. जेव्हा घरी जातात तेव्हा ते कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क करत नाहीत. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ते रोज सकाळी गरम पाणी पितात आणि उन्हात बसतात. आपल्यामुळे कोणाला कोणताही संसर्ग होऊ  नये म्हणून दिवसभर तोंडाला मास्क लावत असल्याचे अनिकेत परब यांनी सांगितले.