डोंबिवलीत श्वान सौंदर्य मेळाव्याला गर्दी

डोंबिवली : डोंबिवलीत आयोजित श्वान सौंदर्य मेळाव्यात विविध पेहराव, रंगसंगती, जातीमधील श्वान रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. व्यासपीठावर अदाकरी सादर करताना प्रत्येक श्वानाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देण्यात येत होता. ठाणे पोलिसांच्या श्वान पथकातील तपासी श्वान या मेळाव्यात सहभागी झाला होता.

रोटरी क्लब ऑफ अपटाऊन, प्रीमिअम पेट संस्थांनी डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर श्वान सौंदर्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे जिल्ह्य़ातील विविध भागांतून आलेले दोनशेहून अधिक श्वानप्रेमी आपल्या लाडक्या श्वानांना घेऊन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लहान मुलांची सर्वाधिक उपस्थिती हेही मेळाव्याचे वैशिष्टय़ होते. क्लबचे संयोजक सुधीर यमगर यांच्या पुढाकाराने मागील अनेक वर्षे या श्वान मेळाव्याचे आयोजन केले जाते. कल्याणमधील केन कॉर्सो या श्वानाला स्पर्धेचे किंग ऑफ शो, मुलुंडच्या चिहुआहुआ या उंदराइतक्या लहान मादी जातीच्या श्वानाला क्वीन ऑफ शो हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

अनेकांना श्वान पाळण्याची हौस असते; पण जागेची अडचण, घरात होत नसलेले एकमत त्यामुळे अनेक तरुणांना घरात श्वान पाळता येत नाही. अशा तरुणांना एक दिवस श्वानांसोबत घालविता यावा.

त्यांची प्राण्यांविषयी असलेली संवेदना अधिक व्यक्त व्हावी या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो, असे संयोजक सुधीर यमगर यांनी सांगितले.

पोलीस गणवेशात त्यांचा तपासी श्वान घेऊन व्यासपीठावर येताच प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. नेहमीच्या पद्धतीने या श्वानानेही त्यांना दिलेल्या अदाकरी सादर केल्या. श्वान व्यासपीठावरून खाली उतरला की त्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लहान मुले, तरुण, तरुणी यांची झुंबड उडत होती.