ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान महापालिकेचे एकही अधिकृत वाहनतळ नाही. त्यामुळे या रेल्वे स्थानकांच्या जवळील रस्त्यांवर दररोज सुमारे दहा हजार दुचाकी उभ्या असतात. शहर आणि गाव परिसरातून नोकरीनिमित्त मुंबई परिसरात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या या दुचाकी सकाळी रस्त्यांलगत उभ्या करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीतून नागरिकांना वाट काढणे अवघड होऊन बसले आहे.
वाहतूक विभागाने या तिन्ही रेल्वे स्थानकांच्या भागांत सम, विषम तारखा निश्चित करून वाहनतळासाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार वाहनचालक रस्त्यावर पदपथाला खेटून आपली वाहने उभी करून निघून जातात. ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानक भागांत महापालिकेचे एकही वाहनतळ नाही. वाहनतळासाठी काही जागा उपलब्ध आहेत, पण त्या खासगी विकासक, जमीनमालकांनी बळकावल्या आहेत. वाहनतळाच्या माध्यमातून महापालिकेला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळू शकतो.
डोंबिवलीत फडके रोडचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला होता. या वेळी तयार झालेल्या सिमेंट रस्त्यावर वाहतूक होत नसल्याने परिसरातील वाहनचालक आपली वाहने या रस्त्यावर आणून ठेवत होते. दररोज ४०० ते ५०० दुचाकी या रस्त्यावर उभ्या करण्यात येत होत्या. यापूर्वी ही वाहने फडके रस्त्यालगतच्या गल्लीबोळांमधील रस्त्यावर उभी करण्यात येत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे जमीनमालक आपल्या मोकळ्या जागेत दोन ते तीन हजार दुचाकी उभ्या करण्यास मुभा देतो. एमआयडीसी, गाव परिसरातील चाकरमानी या वाहनतळावर वाहने उभी करतात. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागांतील मानपाडा रस्ता, महात्मा फुले रस्ता या रस्त्यांवर वाहतूक विभागाकडून दुचाकी चालकांना वाहने उभी करण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय डोंबिवलीत रेल्वेचे द्वारका हॉटेलसमोर वाहनतळ आहे. या ठिकाणी पैसे मोजावे लागत असल्याने बहुतांशी नागरिक या वाहनतळाकडे पाठ फिरवतात. पालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळील पी. पी. चेंबर्स मॉलमध्ये अनेक वाहनचालक पैसे मोजावे लागतात म्हणून तेथे जाण्यासाठी पाठ फिरवतात. राजाजी रस्त्यावरील स्वामी नारायण मंदिराजवळ रेल्वेचे वाहनतळ आहे. तेथेही तुरळक वाहने असतात.

वाहनतळांसाठी जागा
पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचे बहुद्देशीय इमारतीत रूपांतरण करून या ठिकाणी पालिका कार्यालयाबरोबर केडीएमटीचे थांबा, रिक्षा, दुचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. सहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या या इमारतीचा ‘बीओटी’ तत्त्वावर विकास करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आणण्यात आला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्या वेळी तो हाणून पाडण्यात धन्यता मानली होती. हा प्रकल्प यशस्वी झाला तर बाजी प्रभू चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास साहाय्य होणार आहे. डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोरील मासळी बाजाराची वास्तू विकसित केली तर तेथेही बहुमजली इमारत उभी राहू शकते. येथे मासळी बाजाराबरोबर वाहनतळाचा पर्याय आहे.