राज्य शासनाकडून ५ कोटी तर पालिकेकडून १० कोटींची तरतूद

दशकभरापासून रखडलेल्या बदलापूर येथील सोनिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

निधीअभावी रखडलेल्या या स्मारकासाठी राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय विभागांतर्गत ५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेनेही १० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केल्याने अखेर या स्मारकाला मुहूर्त मिळाला आहे.

जातीय सलोखा राखण्याचा मोठा प्रयोग बदलापुरात १९२७ साली झाला होता. त्यावेळी शिवजयंतीच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ३ मे १९२७ रोजी बदलापूर गावाला भेट दिली होती. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या या स्मृतींचे जतन करण्यासाठी बदलापुरातील सोनिवली येथे डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. आमदार किसन कथोरे यांनी या कामाला सुरुवातही केली होती. मात्र निधीअभावी गेल्या दशकभरापासून या स्मारकाचे काम रखडले होते. अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीच्या निमित्ताने राज्यातील अनेक स्मारकांची उभारणी करण्यात येत आहे. बदलापूरच्या सोनिवली येथील स्मारकासाठीही त्यातून निधीची तरतूद करण्यात आली असून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने यासाठी ४ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच कुळगांव बदलापूर नगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल १० कोटींची तरतूद या स्मारकासाठी केली आहे. त्यामुळे याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या दसऱ्यापर्यंत या स्मारकाचे बहुतांश काम झाले असेल अशी अपेक्षा नगराध्यक्षा विजया राऊत यांनी व्यक्त केली आहे. नुकतीच आमदार किसन कथोरे, नगराध्यक्षा विजया राऊत, पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी वास्तुविशारद सतीश ओक यांच्यासह स्मारकाला भेट दिली होती. त्या वेळी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालानुसार बदल करून काम पूर्ण करण्याचे आदेश कथोरे यांनी दिले. तसेच दसऱ्यापर्यंत एक वेगळ्या धाटणीचे स्मारक येथे उभे राहील असा विश्वासही या वेळी त्यांनी बोलून दाखवला. आपल्या काळात स्मारक पूर्ण होत असल्याने यात निधीची कमतरता जाणवणार नाही, असे नगराध्यक्षा विजया राऊत यांनी स्पष्ट केले.

स्मारक असे

बदलापूरच्या उल्हास नदीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर चार एकर परिसरात उभ्या राहणाऱ्या या स्मारकात बौद्ध मंदिर उभे राहिले आहे. त्यासोबतच येथे वाचनालय, सभागृह, पुतळा, निवास व्यवस्था, उद्यान, कारंजे अशा गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे.