हॉटेलांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन; यंत्रणांचे दुर्लक्ष

किशोर कोकणे, ठाणे</strong>

सरत्या वर्षांला दणक्यात निरोप देऊन नववर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी येऊर परिसरात येणाऱ्यांची संख्या दरवर्षीच जास्त असते. मात्र, या परिसरात केवळ चार हॉटेलांमध्येच मद्यविक्रीची परवानगी आहे. असे असताना परिसरातील अन्य उपाहारगृहे ३१ डिसेंबर रोजी बेकायदा मद्यविक्री व पेयसेवा उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, येऊरमधील या कारवायांकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही काणाडोळा केला आहे.

येऊर वन परिक्षेत्रात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. येऊर वनपरिक्षेत्रात केवळ चार हॉटेल मालकांकडे बार आणि उपाहारगृहाचा परवाना आहे. या व्यतिरिक्त या भागात सुमारे १८ हॉटेल उघडण्यात आली आहेत. या हॉटेल मालकांकडे उपाहारगृहाचा परवाना आहे. या उपाहारगृहाच्या परवान्यावर केवळ खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी असते. मात्र अनेक उपाहारगृहांत खुलेआम मद्यपाटर्य़ा सुरू आहेत. या उपाहारगृहांमध्ये ठरावीक पैसे आकारून तरुण-तरुणींना बाहेरून आणलेले मद्य प्राशन करण्यास हिरवा गालिचा अंथरला जात आहे. तसेच जे ग्राहक बाहेरून मद्य आणत नाहीत, त्यांना उपाहारगृहातील मालक दुपटीने पैसे आकारून मद्य पुरवीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘येऊरमध्ये दररोज सुमारे २ हजार पर्यटक येत असतात. येथील उपाहारगृहांमध्ये मद्य पाटर्य़ा करतात. याची माहिती संबंधित विभागाकडे असते. मात्र, त्यांच्याकडून कारवाई होत नाही,’ असा आरोप रहिवासी स्वप्निल महिंद्रकर यांनी केला.

 

३१ डिसेंबरला जंगी पाटर्य़ा

प्रकाशझोतात चालणाऱ्या टर्फ आणि रात्रीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याचे येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी नुकतेच जाहीर केले होते. मात्र, २९ डिसेंबरला उपाहारगृहांमध्ये संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यातील काही उपाहारगृहे ३१ डिसेंबरला रात्रीपर्यंत सुरू असणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

करचोरी

या उपाहारगृहांत येणाऱ्यांना कच्चे देयक (बिल) दिले जाते. यात वस्तू आणि सेवा कराचे कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे कराची देखील चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.

परवान्यासाठीचे नियम

’ बारच्या परवानगीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडे ६ लाख ५० हजार रुपये भरावे लागतात. दरवर्षी या परवान्याचे नूतनीकरणासाठी ६ लाख ५० हजार रुपये भरावे लागते.

’ उपाहारगृहाच्या परवान्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे वार्षिक केवळ २ हजार रुपये भरून परवाना काढता येतो.

उत्पादन शुल्क आणि येऊर वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांकडून दररोज येऊरच्या पायथ्याशी गस्त घालण्यात येते. उपाहारगृहात मद्य प्राशन होत असेल तर आमच्या विभागाकडून कारवाई करण्यात येते.

नितीन घुले, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग