दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त वाहनचालकांकडून टपऱ्या हटविण्याची मागणी
कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा टपऱ्या जमीनदोस्त करून रस्ते मोकळे केले जात आहेत. अशाच प्रकारची कारवाई डोंबिवली पूर्वमधील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील हनुमान मंदिर ते गावदेवी मंदिर रस्त्यापर्यंत करण्यात यावी. या रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात दुकाने, टपऱ्यांची वाढीव बांधकामे झाली आहेत. ही बांधकामे सकाळ, संध्याकाळी वाहतुकीला मोठा अडथळा आणतात. त्यामुळे ही सगळी बेकायदा बांधकामे पालिकेने जमीनदोस्त करावी, अशी मागणी या भागातून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
डोंबिवलीतून दररोज हजारो प्रवासी नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथच्या दिशेने नोकरी व्यवसायासाठी जातात. अनेक प्रवासी केडीएमटी, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसने प्रवास करतात. काही नोकरदार स्वत:ची चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन या रस्त्याने ये-जा करतात. परंतु सकाळच्या वेळेत सागाव ते गावदेवी मंदिरादरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा फर्निचर, कपडा, लोखंड, बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या कंपन्या, मॉलसारखी दुकाने झाली आहेत. या दुकानांच्या कोपऱ्यावर काही ठिकाणी टपऱ्या आहेत. या दुकानांसमोर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या गाडय़ा लागलेल्या असतात. त्यात या भागात अनेक ठिकाणी फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे सकाळ, संध्याकाळच्या वेळेत सागाव भागातून ये-जा करणे अवघड होते.
आयुक्तांना पाहणीचे आवाहन
सकाळी शहरातून अनेक नागरिक प्रवासाला निघतात. त्यांना नेहमी सागाव भागात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. तसेच संध्याकाळी ही मंडळी डोंबिवलीत परतताना सागाव येथेच कोंडीत अडकून पडतात. कोंडीमय झालेल्या या रस्त्याची पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी एकदा पाहणी करून रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकानांची वाढीव बेकायदा बांधकामे तोडून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.