अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे शहरवासी हैराण झाले आहेत. दीड महिन्यांहून अधिक काळ कामानिमित्ताने रस्ते खोदून ठेवल्याने त्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडीही होत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालविताना वाहनचालकांना प्रचंड त्रास होत असून यामुळे पाठदुखी, कंबरदुखीचे दुखणे त्यांच्या पाठी लागले आहे.

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे सीमेंट क्रॉंक्रीटीकरणाचे काम महापालिकेने निवडणुकीनंतर पुन्हा एकदा हाती घेतले आहे. सुरुवातीला या कामांनी वेग घेतला परंतू आता त्यांचा वेग कमालीचा मंदावला आहे. पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील विष्णूनगर परिसरात रस्त्याचे काम सुरु आहे तर पूर्वेतील इंदिरा चौकातील रस्त्याचे काम केले जात आहे. त्यामुळे एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे. परंतू हे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून दीड महिना झाला तरी रस्त्याखालील वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. या संथगतीच्या कामाचा प्रवाशांना तसेच वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहने कशीही आडवी तिडवी चालवावी लागतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होतेच, शिवाय ते चालविणाऱ्यांचे आरोग्यही बिघडते.

रिक्षा चालक, मोटारसायकल चालक यांना पाठदुखी, कंबरदुखी उद्भवली आहे. तसेच गरोदर महिलांनाही या रस्त्यांच्या कामाचा त्रास होत आहे. याविषयी रिक्षा चालक प्रवीण दुधे याने सांगितले की, खोदलेल्या रस्त्यांवरुन रिक्षा चालविताना ती खुप आदळते. त्यामुळे पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. त्याची झीज झाल्याने मणक्यात गॅप आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. चिंतन माळी म्हणाले सर्वसाधारण रिक्षाचालकांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास आहे. रस्त्यांचे काम तर गेले कित्येक महिने सुरु आहे, आज या रस्त्याचे तर उद्या त्या रस्त्याचे. ही कामे पालिकेने लवकरात लवकर पूर्ण करावीत. निवडणुकीपूर्वी वारेमाप आश्वासने देऊन अच्छे दिनाचे गाजर दाखविणाऱ्या राजकारण्यांनी या कामांकडे लक्ष द्यावे, असेही एका रहिवाशाने सांगितले.