आरटीओ विभागाची कुठलीही परवानगी नसताना टेक्सी चालक व बसचालकांना बनावट बॅच बनवून विकणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंब्रा येथून अटक केली. ११३ बनावट बॅच असा मुद्देमाल ही पोलीस पथकाने हस्तगत केला. यातील अटक करण्यात आलेल्या आरोपीना १० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
साजिद अबुबकर मांडवीवाला (३३) आरोपी मोहम्मद सलीम इब्राहीम भुजवाला(५५) दोघे ही मुंब्रा येथे राहणारे आहेत. टॅक्सी आणि बस चालविण्यासाठी आरटीओ द्वारा देण्यात येणारा बॅच कुठलाही परवाना नसताना बनावट बॅच बनवून ते लोकांना विकत असल्याची माहिती खबऱ्याने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मुंब्रा येथील न्यू मुसाकासम बिल्डींग, दुसरा माळा, रूम नं १० मध्ये पोलिसांनी छापा मारला. सदर खोलीत आरोपी साजिद आणि मोहम्मद सलीम दोघे अनधिकृतपणे आरटीओचे बॅच बनवीत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत त्यांच्याकडे कुठलाच आरटीओचा परवाना नव्हता घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करीत खोलीतून कॅब चालकांचे त्रिकोणी पितळी १३ बॅच, कॅब चालकांचे त्रिकोणी पितळी कटिंग न केलेल्या अवस्थेतील २० बॅच, बस चालकाचे गोल ६ बॅच, कॅब चालकाचे निळ्या रंगाचे पितळी ६ बॅच पितळाचे आयतीकृती कंडक्टरचे ८ बॅच, अर्धवट असलेले ६ बॅच असे एकूण ११३ बॅच ते बनविण्यासाठी लागणारे साहित्यात हॅन्ड ड्रिल मशीन, कानस, हातोडी,एक्सो फेम आदी साहित्य जमा करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 11:10 pm