संथगती कामामुळे उभारणीची मुदत टळणार

कल्याण : कल्याणमधील दुर्गाडीजवळील दुर्गामाता चौक आणि भिवंडी बाजूकडील कोन गाव परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या नवीन दुर्गाडी उड्डाणपूल उभारणीचे काम ‘मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने’ दोन वर्षांपूर्वी हाती घेतले आहे. मार्च २०१९ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु या कामाची गती पाहिली तर पुढील पाच ते सहा वर्षांत हे काम पूर्ण होणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येते. या पुलाच्या संथगती कामाकडे कामाचा कंत्राटदार, या कामाचे नियंत्रक ‘एमएमआरडीए’ अधिकाऱ्यांचेही लक्ष नसल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई, नाशिककडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांचा लोंढा कल्याण शहरात येताना भिवंडी बावळण रस्त्याने येतो. बाह्य वळण रस्त्याने वाहने कल्याण शहरात येत असताना कोन गावातील अरुंद रस्ते, अतिक्रमणांमुळे या भागात वाहनांच्या रांगा लागतात. ही वाहने जुन्या दुर्गाडी पुलावरून जाताना मोठी कोंडी होते. या कोंडीत अवजड वाहने अडकून पडतात. त्याचा फटका रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना बसतो. कल्याण शहरातून भिवंडीकडे जाणारी वाहने दुर्गाडी पुलावर वाहतूक कोंडी असली की दुर्गाडी जवळील दुर्गा माता चौकात अडकून पडतात. त्यामुळे शहराबाहेरील मुख्य रस्ता सतत वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेला असतो. या कोंडीला पर्याय म्हणून शासनाने सहा वर्षांपूर्वी दुर्गाडीजवळील उल्हास खाडीवर जुन्या उड्डाणपुलाला पर्याय म्हणून नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन दुर्गाडी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मार्च २०१६ मध्ये या कामाचे आदेश सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड या बांधकाम कंपनीला दिले. डिसेंबर २०१६ मध्ये ठेकेदाराने पुलाच्या कामाला प्रारंभ केला. दीड वर्ष होत आले तरी पुलाचे आवश्यक काम पूर्ण झालेले नाही.

अधिकाऱ्यांची झाडाझडती

विकास कामांचा आढावा घेण्याच्या बैठकीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नवीन दुर्गाडी उड्डाणपुलाच्या प्रगतीबाबत ‘एमएमआरडीए’ अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावेळी ठेकेदाराचे काम संथगती असल्याचे दिसून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुदतीत काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराला सांगितल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.