ठाणे आणि शिवसेना हे समीकरण तयार झाले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाण्याने नेहमीच शिवसेनेला साथ दिली. शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली ती ठाण्यातच. देशात आणि राज्यात भाजपच्या लाटेत सर्व पक्षांमधील प्रस्थापित नेत्यांचे बालेकिल्ले खालसा झाले. पण  त्याला अपवाद ठरले ते ठाणे. सतीश प्रधान, आनंद दिघे या नेत्यांची परंपरा पुढे सुरू ठेवत एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावर शिवसेनेची पकड कायम ठेवली आहे. खऱ्या अर्थाने शिंदे हे ठाणेदार झाले आहेत !

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या मोठय़ा नगरपालिकांची सत्ता हस्तगत केल्यानंतर ठाणे जिल्हा परिषद एकहाती जिंकून ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरी तसेच ग्रामीण भागावर एकहाती राजकीय पकड प्रस्थापित केली आहे. आनंद दिघे यांच्या निधनानंतर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवणारा नेता अशी शिंदे यांची ओळख जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याने अधिक घट्ट झाली आहे.  गेल्या  तीन वर्षांत जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक निवडणुकीत भाजप आणि काही वेळा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन हात करत शिंदे यांनी शिवसेनेला मिळवून दिलेले विजय वाखणण्याजोगे ठरले आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून आनंद दिघे यांच्या कारकिर्दीपर्यंत   ठाणे महापालिकेत शिवसेनेला कधी स्वबळावर सत्ता मिळाली नव्हती. पण गेल्या वर्षी निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले.  महापालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण ताकदीनिशी उतरल्यानंतरही शिंदे यांनी ठाण्यात मात्र त्यांची डाळ शिजू दिली नाही. जेथे आपली ताकद आहे तेथे स्वबळाने उतरायचे आणि जेथे कमी तेथे  अन्य पक्षांमधील नाराजांचा गळाला लावायचे यात शिंदे वाकबगार मानले जातात. कोणत्या भागात कधी निवडणुका आहेत याचे वेळापत्रक जाहीर होण्यापुर्वी कितीतरी आधीपासून शिंदे मैदानात उतरतात. त्यामुळे स्थानिक मतदारसंघ, शहरातील राजकीय हवा नेमक्या कोणत्या दिशेने वाहते आहे याचा अंदाज त्यांना जिल्ह्यातील इतर पक्षाच्या नेत्यांपेक्षा खूप लवकर बांधता येतो. राज्यात भाजपची हवा असतानाही ठाणे आणि कल्याणच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे अध्र्याहून अधिक दिग्गज नगरसेवकांना शिंदे यांनी आपल्या तंबूत खूप आधीच घेतले. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या शहरांमध्येही कमी अधिक प्रमाणात त्यांनी हीच रणनिती आखली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक भाजपने कमालीची प्रतिष्ठेची केली होती. सरकारी यंत्रणा भाजपच्या कलाने चालत असल्याच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भाषा शिंदे यांना तेव्हा करावी लागली होती. सारे प्रतिकूल असतानाही कल्याण-डोंबिवलीची सत्ता शिवसेनेला मिळाली आणि भाजप सेनेबरोबर सत्तेत भागीदार व्हावे लागले. हे सारे यश शिंदे यांचे होते.

ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकानिमीत्त शिंदे ग्रामीण भागातील काही तालुक्यांमध्ये  तळ ठोकून असल्याचे चित्र पहायला मिळत होते. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत दोन हात करावे लागणार याची खूणगाठ शिंदे यांनी पक्की बांधली आहे. त्यामुळे ठाण्यासोबत खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात ते आतापासूनच पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत. लगतच असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेची चांगली ताकद आहे. गेल्यावेळी भिवंडी पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे आग्रही होते. मात्र, जागा वाटपाच्या सुत्रात ते काही जमले नाही. भिवंडीतील शहापूर, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण भागातील ग्रामीण पट्टयात शिवसेनेची उत्तम संघटनात्मक बांधणी आहे. या बांधणीच्या जोरावर देशात कोणाचेही वारे असले तरी भाजपला धक्का देता येईल असा संदेश शिंदे शिवह्णसैनिकांच्या मनावर गेल्या काही महिन्यांपासून बिंबविताना दिसत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांबद्दल शिवसेनेच्याच आमदारांमध्ये नेहमीच नाराजी दिसते. याला अपवाद फक्त एकनाथ शिंदे यांचा.