धान्याची उचल न केल्याचा शिधापत्रिकाधारकांना फटका

लोकसत्ता वार्ताहर

वसई :  मागील पाच महिन्यापासून  धान्याची  उचल न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांना यापुढे  धान्य न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये वसईतील १८ हजार १८६ शिधापत्रिका धारकांनी धान्याची उचल केली नसल्याने या धारकांना मिळणारे धान्य बंद करण्यात येणार आहे.

अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जाते. या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने शिधापत्रिका संगणकीकृत करून बायोमॅट्रिक पद्धतीने धान्याचे वितरण सुरू केले आहे. परंतु काही लाभार्थी शिधापत्रिका धारक या धान्याची उचल करीत नसल्याचे  निदर्शनास आले आहे. यामुळे आता पाच महिन्यापेक्षा अधिक काळ धान्य न घेतलेल्या शिधापत्रिका धारकांची चौकशी होणार असून या शिधापत्रिका धारकांना मिळणारे धान्य बंद केले जाणार आहे.

वसईत ३ हजार ७१९ अंत्योदय शिधापत्रिका,तर १ लाख २७ हजार ६६६ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक आहेत. त्यापैकी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये १८ हजार १८६ शिधापत्रिका धारकांनी धान्याची उचल केली नसल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. शिधापत्रिका नोंदणी प्रक्रिया संगणकीय झाल्याने जे लाभार्थी धान्य उचलत नाही त्यांना जो पर्यंत बाजूला केले जात नाही तो वर इतर नवीन लाभार्थ्यांंना लाभ ही देता येत नाही यासाठी जे अपात्र लाभार्थी आहेत. त्यांना धान्याची गरज नाही असे धारकांना निलंबित करून त्यांच्या शिधापत्रिका  शिधाजिन्नस अनुज्ञेय नाही ( एनईआर) यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत.

मागील पाच महिन्यापासून जे शिधापत्रिका धारक धान्य घेत  नाहीत.अशा धारकांची माहिती घेऊन या धारकांना मिळणारे धान्य बंद करण्यात येणार आहे.

— रोशन कापसे, पुरवठा अधिकारी वसई

शिधापत्रिकाधारक

अंत्योदय शिधापत्रिका

— ३ हजार ७१९

प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका

— १ लाख २७ हजार ६६६

एपीएल शिधापत्रिका

—   १ लाख ८७ हजार ८७५

शुभ्र शिधापत्रिका

—  २० हजार २४६

एकूण शिधापत्रिका

— ३ लाख ३९ हजार ५०६