महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामांची घाई; वीजवाहिन्या उघडय़ावर असल्याने अपघाताची शक्यता

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवता यावा यासाठी महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांना वेग देण्यात आला आहे. असे असले तरी शहरातील शेकडो वीजवाहिन्या अद्याप उघडय़ा अवस्थेत असल्याची बाब समोर आली आहे. कल्याण शहरात उघडय़ा वीज वाहिन्यांची संख्या मोठी असून पावसाळ्यात या वाहिन्यांचा पाण्याशी संपर्क होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महावितरणचे कल्याण परिमंडळाचे मुख्य कार्यालय असलेल्या मुरबाड रस्त्यावरील अनेक भागांत उघडय़ा वीज वाहिन्यांच्या जोडण्या दिसून येत आहेत. महावितरणकडून मात्र या वाहिनींच्या देखभाल दुरुस्तीचे कोणतेच प्रयत्न होत नसल्याची टीका होऊ लागली आहे. त्यामुळे या भागात नागरिकांचा वावर धोकादायक बनला आहे. कल्याण शहरातील अनेक भागांत खांबावरून वीज वाहिन्या जोडण्यात आल्या असून परिसरात एक डीपी बॉक्स बसवण्यात येतो. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, गणेशवाडी, विठ्ठलवाडी, खडेगोळवली या परिसरांत अशा प्रकारच्या वीज जोडण्यांचे प्रमाण अधिक आहे. कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड, रामबाग, टिटवाळा, शहाड या परिसरातही महावितरणच्या खांबावरील जोडण्या आहेत. या भागात खांबावर डीपी बॉक्स बसवून त्यावरून घराघरात वीजेचा पुरवठा केला जातो. अनेक ठिकाणी या डीपी बॉक्सची दुरवस्था झाली असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. या वीज वाहिन्यांमधून विद्युतपुरवठा खांबांमध्ये उतरून पादचाऱ्यांना त्याचा धक्का बसत असतो. या प्रकारचे अपघात कल्याण परिसरामध्ये झाले असून त्यानंतरही ही परिस्थिती कायम आहे.

पावसाळ्यात हा वीजपुरवठा परिसरातील पाण्यात उतरण्याची अधिक शक्यता असते. दोन वर्षांपूर्वी विजेचा धक्का बसून या भागात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तात्पुरत्या सूचना देऊन महापालिकेने हा प्रकार बंद केला होता. मात्र यंदाही पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक भागांतील डीपी बॉक्स उघडय़ा अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. याविषयी महावितरणच्या कार्यालयात तक्रारी केल्या जात असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती मुरबाड रोज परिसरात राहणाऱ्या सचिन मोरे यांनी दिली. तर महावितरणच्या कल्याण परिमंडळाच्यावतीने डीपी बॉक्स बंद करण्यात आल्याचा दावा केला  आहे.

पावसाळा तोंडावर येताच महावितरणकडून देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येत असतात. त्यासाठी शहरातील महत्वाच्या भागांची वीज पुरवठा सुमारे पाच ते सात तास खंडीत करण्यात येतो. असे असले तरी शहरातील उघडय़ा डीपी बॉक्सचा प्रश्न आजही कायम आहे. या प्रकारामुळे पावसाळ्यात मोठय़ा अपघाताची शक्यता आहे. विशेषत: शाळकरी मुलांसाठी हे खांब धोकादायक ठरू शकतात. अनेक शाळांच्या परिसरातील डीपी बॉक्सची अवस्था तुटकी झाल्याने शाळा प्रशासनाही चिंतेमध्ये आहेत.

 संतोष मेदगे, कल्याण