रानमेवा, रानभाज्या विकणारे आदिवासी तसेच खाद्यपदार्थ विक्रेते संकटात

सागर नरेकर

बदलापूर : टाळेबंदीमुळे आधीच तोटय़ात गेलेला व्यवसाय आता कुठे रुळावर येत असतानाच जिल्ह्य़ातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे पर्यटनस्थळांच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या आदिवासी तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या रोजगारावर पुन्हा संकट कोसळले आहे. बंदीमुळे पर्यटक आले नाही तर रानमेवा, रानभाज्या विकायच्या कुठे असा प्रश्न आदिवासींना पडला आहे. छोटेखानी छपरात खाद्यपदार्थाच्या किरकोळ विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांच्यातही अस्वस्थता पसरली आहे.

निसर्गसंपन्न असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी पर्यटनस्थळे आहेत. यात धरणाचे पाणलोट क्षेत्र, नद्यांचे काठ, धबधबे, गड किल्ले, माळरान अशा ठिकाणांचा समावेश आहे. निसर्गाच्या कुशीत असणारी ही स्थळे शहरांपासून बरीच दूर आहेत. पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढल्यानंतर येथील स्थानिक रहिवासी फळे, भाज्या, मासे विक्रीची दुकाने थाटतात. पर्यटकांना याच स्थानिकांच्या मदतीने अस्सल घरगुती जेवण आणि इतर खाद्यपदार्थाची चव चाखता येते. स्थानिकांनाही यातून चांगला रोजगार मिळतो. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जात असल्याने येथील रोजगार धोक्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून टाळेबंदीमुळे पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे स्थानिकांचा रोजगार बुडला होता. यंदा पावसाळ्यात चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा स्थानिकांना होती. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने पुन्हा संपूर्ण पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर बंदी घातल्याने स्थानिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. काहीनी दुकाने सुरू ठेवली तरी बंदी आदेशानंतर पर्यटक येतील का, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. त्यामुळे खिशातले पैसे घालून सुरू केलेला छोटेखानी व्यवसाय गुंडाळावा लागण्याची भीती स्थानिकांना वाटते आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात टाळेबंदी घोषित केल्याने एरवी रपेटीसाठी ग्रामीण भागाकडे येणारे प्रवासी घटले होते. एप्रिल महिन्यात कडक टाळेबंदीमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील नियमांमुळे दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा पर्यटनबंदीमुळे व्यवसाय ठप्प पडण्याची स्थानिकांना भीती आहे.

रानभाज्या, मासे आणि रानमेव्याचे करायचे काय?

जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, कल्याण-अहमदनगर राज्यमार्ग, काटई-कर्जत राज्यमार्गावर विविध ठिकाणी आदिवासी जांभूळ, करवंद, रानभाज्या, मासे विक्रीसाठी घेऊन बसतात. रस्त्यांवरून प्रवास करणारे पर्यटक त्यांचे प्रमुख ग्राहक असतात. मात्र बंदीमुळे या विक्रीयोग्य वस्तूंचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. जिल्ह्य़ात माळशेज घाट आणि पायथा, सिद्धगड, हरिश्चंद्र गड, बदलापूरजवळ कोंडेश्वर, बारवी धरणाचा पायथा, येऊर, रेतीबंदर, खडवली, भातसा धरण, माहुली, अशोका धबधबा, गणेशपुरी परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.