News Flash

उल्हास नदी निर्माल्यमुक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले!

गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ाची तहान भागवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या उल्हास नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे.

उल्हास नदी निर्माल्यमुक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले!

उल्हास नदी बचाव कृती समितीकडून निर्माल्य संकलन; नदीकिनारी केंद्रांची स्थापना

बदलापूर : उल्हास नदीच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या उल्हास नदी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सवाच्या काळात यंदा पुन्हा नदीकिनारी निर्माल्य संकलन केंद्रे उभारली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून १२५ हून अधिक सदस्य उल्हास नदीच्या रायते, पाचवा मैल, मोहने बंधारा या केंद्रांवर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मूर्तीसोबतच्या निर्माल्याला संकलित करून ते नदीत जाण्यापासून वाचवतात. दरवर्षी सुमारे २५ टन निर्माल्य या केंद्रांवर संकलित होते. स्थानिक ग्रामपंचायती आणि पोलिसांच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ाची तहान भागवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या उल्हास नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नदीवर मोठय़ा प्रमाणात जलपर्णी दिसत आहे. त्यावर आता सगुणा रूरल फाऊंडेशनच्या मदतीने तोडगा काढला आहे. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने नदीच्या पात्रात पुन्हा निर्माल्य जाऊन ती प्रदूषित होण्याचा धोका आहे. हाच धोका ओळखत उल्हास नदीच्या संवर्धनासाठी आग्रही असलेल्या उल्हास नदी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी गणेश स्थापनेच्या दुसऱ्या दिवसांपासूनच उल्हास नदीकिनारी विसर्जित होणाऱ्या मूर्तीसोबतच्या निर्माल्याला रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार उल्हास नदीवर मोहने बंधारा, पाचवा मैल आणि रायते येथे निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. उल्हास नदीच्या पात्रापासून काही अंतरावर ही केंद्र उभारली आहेत. विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांना याच केंद्रांवर रोखून त्यांच्याकडील हार, फुले, प्लास्टिक, कागद आणि सजावटीचे जे काही साहित्य असले ते सर्व केंद्रांवर काढून घेतले जाते. विसर्जन करण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीला जाण्याची विनंती केली जाते. तसेच मूर्तीसोबत फक्त एक नारळ घेऊ दिले जाते, अशी माहिती उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य अश्विन भोईर यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून समिती हे काम करत आहे. दरवर्षी नदीकिनारी अशा संकलन केंद्रांमधून २५ टन निर्माल्य संकलित केले जाते. यंदाही तसाच निर्माल्याचा ओघ असल्याचेही भोईर यांनी सांगितले आहे.

स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाच्या मदतीने १२५ हून अधिक सदस्य याकामी कार्यरत असून दीड दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज शेकडो मूर्तीचे या तीन केंद्रांवर विसर्जन केले जाते आहे. मात्र उल्हास नदी बचाव कृती समितीच्या सदस्यांच्या या उपक्रमामुळे २५ टनपेक्षा अधिक निर्माल्य कचरा नदी जाण्यापासून वाचला आहे.

पाच दिवसांत १० टन निर्माल्य संकलित

रवींद्र िलगायत, निकेत व्यवहारे, निकेश पावशे यांच्या गटाने गेल्या पाच दिवसांत समितीच्या वतीने १० टन निर्माल्य संकलित केले आहे. या निर्माल्याला जमिनीत खड्डे करून पुरले जाते. त्यामुळे ते पाण्यात मिसळण्यापासून वाचतात. गणेशभक्तांनी घरच्या घरी मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच नदीपात्रात विसर्जन करत असताना फक्त मूर्तीचेच विसर्जन करावे. निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन समितीचे अश्विन भोईर यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 1:34 am

Web Title: environmentalists rush ulhas river clean ssh 93
Next Stories
1 केंद्रीय मंत्र्यांकडून ठाणे महापालिकेची कानउघाडणी
2 ग्रामीण भागात बँकेचे व्यवहार डिजिटल
3 लसीकरणाची संथगती
Just Now!
X