ठाण्यातील वागळे इस्टेट विभागात यंदा स्थानिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रिक्षाचालकांकडून बळजबरीने वर्गणी गोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील महानगर गॅस पंपाजवळ रांगेत उभ्या असणाऱ्या रिक्षाचालकांकडून तेथील परिसरातील गणेश मंडळातील मुले देणगी गोळा करत होती. या वेळी एका रिक्षाचालकाने देणगी देण्यास नकार दिला. त्याला या मंडळातील मुलांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्याचप्रमाणे कमी देणगी देणाऱ्या रिक्षाचालकांना शिवीगाळ करण्याचा प्रकारही या वेळी सुरू होता. मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला होण्याच्या भीतीने एकही रिक्षाचालक तक्रारीसाठी पुढे आला नाही. दरम्यान, रिक्षाचालकांकडून बळजबरीने देणगी उकळण्याचे प्रकार दर वर्षी ठिकठिकाणी होत असतात. त्यासंबंधी आम्ही त्या त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविणार आहोत, अशी माहिती एकता रिक्षा-टॅक्सी मालक-चालक सेना अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी दिली.