समाजमाध्यमांवरून खोटय़ा जाहिरातींचा प्रसार; आगाऊ पैसे मागवून ‘पोबारा’

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीच्या काळात मद्यविक्रीवर आलेल्या बंदीचा गैरफायदा उचलून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यम स्थळांवर घरपोच मद्यपुरवठा करणाऱ्या खोटय़ा जाहिराती प्रसारित केल्या जात असून आगाऊ पैसे पाठवण्याची मागणी करून तळीरामांना लुबाडण्यात येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे तळीरामांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. अनेक जण केवळ मद्य मिळवण्यासाठी घराबाहेर पडून शोधाशोध करताना दिसत आहेत. यानिमित्ताने मद्याचा काळाबाजार तेजीत आला असताना आता तळीरामांची फसवणूक करण्याची नवी शक्कल भामटय़ांनी शोधून काढली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमांवर हे भामटे मद्यविक्रीच्या जाहिराती करत आहेत. या जाहिराती खऱ्या वाटाव्यात यासाठी ठाणे शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांचे छायाचित्र जाहिरातींमध्ये वापरण्यात येत आहे. ग्राहकांच्या घरपोच मद्यविक्री केली जाईल, असा दावा या जाहिरातींमध्ये करण्यात येत आहे. मद्यखरेदीसाठी संपर्क केल्यास मद्याची ५० टक्के रक्कम आगाऊ अदा करावी लागणार असल्याचे या जाहिरातींमध्ये नमूद करण्यात येते. तसेच रक्कम अदा करण्यासाठी भीम अ‍ॅपची माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर २० मिनिटांत घरपोच सेवा देण्यात येईल असे सांगण्यात येते. मात्र, पैसे अदा केल्यानंतर कोणताही मद्यपुरवठा केला जात नसून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. अशा अनेक तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारची मद्यविक्री सुरू नसून समाजमाध्यमांवर करण्यात येणाऱ्या या सर्व जाहिराती खोटय़ा आहेत. हे सर्व फसवणुकीचे प्रकार असून नागरिकांनी या जाहिरातींना भुलू नये.

– नितिन घुले, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे

नागरिकांनी अशा खोटय़ा जाहिरातींना बळी पडू नये. नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच १०० या क्रमांकावर संपर्क करून तसेच ई-मेलच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येऊ शकते.

– संजय जाधव, उपायुक्त (सायबर सेल)