sahaj-safarभिवंडी तालुक्यातील अणजूर येथील एक पुरातन मंदिर फारसे कुणाला माहीत नाही. मात्र भिवंडी-डोंबिवली या परिसरात हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर आहे तब्बल ३०० वर्षांपूर्वीचे! एका वाडय़ात वसविण्यात आलेल्या या मंदिरातील श्रीगणेशावर या परिसरातील अनेक लोकांची श्रद्धा आहे.
अणजूर हे गाव वसले आहे मुंब्रा-डोंबिवली येथील खाडीच्या पलीकडच्या बाजूला. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीच्या अलीकडे माणकोली गाव लागते. येथून अणजूरला जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाटय़ापासून दीड-दोन किलोमीटरवर अणजूर गावात सुप्रसिद्ध मंदिर आहे. नाईकाची माडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरातन वाडय़ात हे मंदिर आहे. हे मंदिर २८९ वर्षांपूर्वीचे आणि हा वाडा त्याही आधी ६० वष्रे जुना. लाकडी वाडा असलेल्या या मंदिरात देवाच्या गाभाऱ्यासाठी विशेष जागा करण्यात आली असून त्यातील पितळाच्या मखरात श्रींची मूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती आठ इंच उंचीची असून, उजव्या सोंडेची आहे.
या मंदिराचा इतिहास खूपच रोमांचकारी आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. बिंब राजाने १२व्या शतकात हे गाव अंकुशराव राणे या सरदारास भेट म्हणून दिले होते. याचे कारण काय तर अंकुशराव राणे याने बिंब घराण्यातील महाराणी व राजपुत्रास एका संकटातून वाचविले होते. त्यानंतर बिंब राजाने हे गाव भेट देतानाच अंकुशराव राणे यांना नाईक ही पदवी बहाल केली. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी नाईक हेच आडनाव लावण्यात सुरुवात केली. याच वंशजांपैकी गंगोजी नाईक या धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीने १८व्या शतकाच्या सुरुवातीला अणजूर-मोरगाव-चिंचवड असा पायी प्रवास केला होता. गणपतीभक्त असलेल्या गंगोजीला मोरया गोसावी यांचे नातू नारायणराव यांनी एक गणेशमूर्ती भेट दिली. याच मूर्तीची स्थापना गंगोजीने अणजूर येथे केली. अणजूरपासून काही अंतरावर अलिमघर नावाचे गाव आहे. या गावाच्या तीनही बाजूला खाडी असून खाडीचा हा नयनरम्य देखावा डोळय़ांची पारणे फेडणारा आहे. विशेष म्हणजे येथून डोंबिवलीतील रेतीबंदर येथे जहाजे सुटतात. जहाजातून डोंबिवलीला जाण्याची मजा काही औरच आहे.
संदीप नलावडे

अणजूर कसे जाल?
ठाणे स्थानकाबाहेरून अलिमघरला जाणाऱ्या बस सुटतात. या बस अणजूर येथे थांबतात. दरएक तासाने ठाण्यातून अलिमघरला बस सुटते.
कल्याण, भिवंडी येथील एसटी स्थानकातूनही ठरावीक वेळेत अणजूरला जाणाऱ्या बस आहेत.
’ डोंबिवतील रेतीबंदर येथून जहाजाने वेल्हे गावात जाता येते. या वेल्हे गावातून रिक्षाने अणजूरला जाता येते.