News Flash

खाऊखुशाल : पारंपरिक लाडू मिठाईच्या पंगतीत

साजुक तुपातले डिंकाचे लाडू, गुळबुंदीचे लाडू आता मिठाईच्या दुकानातून नाहीसे होऊ लागले आहेत.

दिवसाला साधारण ८ ते १० किलो साजुक तूप वापरून १०० ते १५० विविध प्रकारचे लाडू तयार केले जातात

मिठाई म्हटले की आता डोळ्यासमोर येते ती काजूकतली, बंगाली मिठाई आणि मोतीचूरचे लाडू. या परप्रांतीय मिठाईच्या पंक्तीत आपल्याकडचे खास पारंपरिक लाडू काहीसे मागे पडले आहेत. साजुक तुपातले डिंकाचे लाडू, गुळबुंदीचे लाडू आता मिठाईच्या दुकानातून नाहीसे होऊ लागले आहेत. या पारंपरिक लाडू मंडळींना पुन्हा मिठाईच्या पंगतीत सन्मानाने बसविण्यासाठी डोंबिवलीतील कानिटकर कुटुंबाने खास घरगुती लाडूंचे कॉर्नर सुरू केले आहे.

जशी दर पाच मैलावर भाषा बदलते, अगदी तशीच प्रत्येक प्रांतानुसार लाडूंचे प्रकारही आढळून येतात. या कॉर्नरच्या निमित्ताने राज्यभरातील लाडूंची चव चाखण्याची संधी खवय्यांना उपलब्ध झाली आहे.

शेंगदाणे, शेव, साबुदाणा, डिंक, आळीव, मूग, बेसन असे एकूण १२ प्रकारचे लाडू या एका दुकानात आपल्याला मिळतात. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे आणि साजुक तुपाची चव जिभेवर रेंगाळत ठेवणाऱ्या या लाडूंना डोंबिवलीच्या खवय्यांनी चांगलीच दाद दिली आहे. पूर्वी लाडू हा फक्त दिवाळीच्या काळात फराळाचा एक भाग म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक घरांमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना लाडू दिले जातात. लाडवांची ही वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन कानिटकरांनी खास लाडूंचे दालन सुरू केले.

कोकणातील प्रसिद्ध गुळबुंदीचे लाडू ही या दुकानाची खासियत. गुळाच्या पाकात तयार होणारे हे लाडू अगदी पटकन वळावे लागतात. साधारण दहा मिनिटात शंभर लाडू इतक्या गतीने हे लाडू वळावे लागतात. थंडीच्या दिवसामध्ये खाल्ला जाणारा आळिवाच्या बियांपासून बनवला जाणारा लाडू, साबुदाण्याच्या पिठापासून तयार होणारा लाडू, शिंगाडय़ाच्या पिठापासून बनवलेला लाडू अशा लोकांच्या सहसा खाण्यात किंवा ऐकण्यात नसणाऱ्या लाडूंची मेजवानी या दुकानामुळे डोंबिवलीकरांना चाखायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे लाडू बनविताना खास पारंपरिक रेसिपी वापरली जाते.

दिवसाला साधारण ८ ते १० किलो साजुक तूप वापरून १०० ते १५० विविध प्रकारचे लाडू तयार केले जातात. तुपाची मोठीच्या मोठी कढई सतत शेगडीवर ठेवलेली असते. पीठ साधारण एक तास खरपूस भाजले जाते. कारण पीठ नीट भाजले नसेल तर लाडू तोंडाला चिकटतात. या नव्या दालनातून गेल्या दिवाळीला साधारण चार ते पाच हजार लाडूंची विक्री झाली.

अनेक लोक येथे आधी एकेका लाडूची चव घेऊन जातात. गुळबुंदी, मोतीचूर, डिंक असे काही शाही लाडू वगळता बाकी सर्वच लाडू येथे १५ रुपयाला एक असे मिळतात. किमतीच्या मानाने या लाडूंचा आकारही चांगलाच मोठा आहे. लाडू दुकानात विकले जाणारे असले तरी त्याची चव मात्र घरगुती आहे. त्यामुळेच खवय्यांच्या ते पसंतीस उतरले आहेत.

कानिटकर्स

*  कुठे? स्नेहसदन सोसायटी, कांचनगौरी आणि आयएनजी बँकच्या शेजारी, राजाजी पथ, डोंबिवली (पू.)

*  कधी? सकाळी १० ते दुपारी २ – सायंकाळी ५ ते रात्री १०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 4:36 am

Web Title: famous traditional ladoo shop in dombivali
Next Stories
1 लसीकरणामुळे मूल नपुंसक होण्याची अफवा
2 साखरेचे खाणार..
3 वाढीव वीज बिलाच्या तक्रारीतील विलंब ग्रा
Just Now!
X