विरारच्या प्रवाशांना डहाणू लोकलमधून उतरण्यास विरोध : पालघरचे १४ प्रवासी अटकेत; पश्चिम रेल्वेची वाहतूक दीड तास खोळंबली

नव्याने सुरू झालेल्या चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये चढण्यास वा उतरण्यास पालघरच्या प्रवाशांनी विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाचा भडका बुधवारी रात्री उडाला. डहाणू लोकलमध्ये चढलेल्या विरारच्या प्रवाशांना विरार स्थानक आल्यानंतर उतरू देण्यास पालघरचे प्रवासी नेहमीच मज्जाव करतात. या प्रवाशांना ताब्यात घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) बुधवारी रात्री सापळा लावला होता. मात्र त्यामुळे पालघरचे प्रवासी आणि आरपीएफच्या पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे आरपीएफच्या पोलिसांनी विरारच्या प्रवाशांना विरोध करणाऱ्या १४ प्रवाशांना अटक केली. या गोंधळामुळे चर्चगेट-डहाूण लोकल विरार स्थानकात दीड तास खोळंबून राहिली, त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला.

pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

१० ऑक्टोबरपासून चर्चगेट-डहाणू लोकल सुरू झाली आहे. ही लोकल रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी चर्चगेटवरून सुटते. या लोकलमध्ये चढलेल्या विरारच्या प्रवाशांना पालघरचे प्रवासी उतरू देत नाहीत. या मुद्दय़ावरून त्यांच्यात नेहमी बाचाबाची होत असते. १७ ऑक्टोबरला पवन तिवारी नावाच्या विरारमधील प्रवाशाला अशाच पद्धतीने विरार स्थानकात उतरू देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याला सफाळ्यापर्यंत नाईलाजाने जावे लागले होते. याबाबत त्याने विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार केली होती. त्यामुळे बुधवारी रात्री तिवारी याच्या तक्रारीवरून दादागिरी करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सापळा लावला होता. रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी चर्चगेट-डहाणू लोकल विरार स्थानकात फलाट क्रमांक तीनवर आली होती. तिवारी याने संबंधित प्रवाशांकडे अंगुलीनिर्देश केल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस त्या प्रवाशांना खालू उतरवू लागले. त्याला पालघरच्या इतर प्रवाशांनी जोरदार विरोध केला. यामुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडला. पालघरच्या प्रवाशांनी साखळी खेचून ट्रेन रोखून धरली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाचा अतिरिक्त फौजफाटा मागविण्यात आला.

रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एकूण १४ प्रवाशांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्यावर गोंधळ माजवणे, धक्काबुक्की करणे, साखळी खेचणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या १४ प्रवाशांना गुरुवारी रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे ९ प्रवाशांची १५०० रुपये, ४ प्रवाशांची १ हजार रुपये तर एका प्रवाशाची ५०० रुपये दंड आकारून सुटका करण्यात आल्याचे विरार रेल्वे सुरक्षा बलाचे साहाय्यक आयमुक्त ईश्वर सिंग यांनी सांगितले.

सौराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ बदलली अन्..

पूर्वी पालघरच्या प्रवाशांसाठी बोरिवलीहून रात्री सव्वानऊ  वाजता सौराष्ट्र एक्स्प्रेस सुटत होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सौराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ एका तासाने वाढवली. ती रात्री सव्वादहा वाजता येऊ  लागली. यामुळे प्रवाशांचा रोष वाढला. सौराष्ट्र एक्स्प्रेसनंतर अरवली एक्स्प्रेसला पालघरला थांबा देण्याची मागणी करण्यात आली. ती मान्य झाली नाही. त्यामुळे पालघरच्या प्रवाशांसाठी खास ८ वाजून २७ मिनिटांनी चर्चगेटहून सुटणारी डहाणू लोकल सुरू झाली. १० ऑक्टोबरपासून ही लोकल सुरू झाली होती. ती सव्वा नऊ  वाजता बोरिवलीत यायची. सौराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ बदलल्याने पालघरच्या प्रवाशांसाठी ही खास गाडी होती. पण त्यातही नालासोपारा आणि विरारचे प्रवासी चढू लागल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

लाठीमार केल्याचा प्रवाशांचा आरोप

रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईमुळे पालघरचे प्रवासी संतप्त झाले आहेत. आमच्यावर अन्याय होत असूनही पोलिसांनी आमच्यावरच कारवाई केल्याचे या प्रवाशांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांवर लाठीमार केल्याचा तसेच मारहाण केल्याचा आरोप पालघरच्या रेल्वे प्रवाशांनी केला. विरारचे प्रवासी आमच्यावर दादागिरी करत होते. अचानक रेल्वे पोलीस आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली, असे निखिल दीक्षित या प्रवाशाने सांगितले. मी माझ्या सहकारी प्रवाशाची मदत करत होतो, पण मला पकडून नेले आणि पोलीस ठाण्यात बसवले. मला १५०० रुपयांचा दंड आकारला. पण मी काहीच केले नाही, असे निखिलने सांगितले. रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत एक पालघरचा प्रवासी बेशुद्ध पडला होता, असाही आरोप पालघरच्या रेल्वे प्रवाशांनी केला.

‘आरपीएफ’कडून कारवाईचे समर्थन

आमच्याकडे तक्रार आली होती, त्यानुसार आम्ही कारवाई केली. आम्ही कुणावरही लाठीमार केला नाही, असे विरार रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख एस. एस. यादव यांनी सांगितले. प्रवाशांनी साखळी खेचून ट्रेन रोखून धरली होती. धक्काबुक्की करणाऱ्या, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या १४ प्रवाशांना आम्ही

अटक केल्याचे यादव म्हणाले. कुणालाही बंदुकीच्या दांडुक्याने मारले नाही किंवा कुणी बेशुद्ध पडले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे सुमारे दीड तास रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

वाद नेहमीचाच!

डहाणू लोकल ही पालघर-डहाणूच्या प्रवाशांसाठी आहे. त्यात विरारचे प्रवासी का चढतात? एरवी विरार लोकलमध्ये बोरिवली किंवा अंधेरीला उतरणारा प्रवासी चढला तर त्याला विरोध केला जातो. मग आमच्या गाडीत हे विरार-नालासोपाराचे प्रवासी का चढतात, असा सवाल पालघरच्या प्रवाशांनी केला.

लोकलमध्ये प्रवाशांचा होणारा वाद नवा नाही. यापूर्वी चर्चगेट लोकलमध्ये चढलेल्या ऋतुजा नाईक या तरुणीला वसईला उतरताना महिलांनी माराहण केली होती. वसईला उतरायचे मग चर्चगेट लोकल का पकडली याबद्दल महिलांनी विरोध केला होता. याप्रकरणी चार महिलांना वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.