महापालिकेच्या ताफ्यात सात दुचाकी; आगीच्या ठिकाणी पाच मिनिटांत पोहोचण्याचे लक्ष्य
आग लागलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी अग्निशमन दलाच्या ताफ्यात सात अत्याधुनिक अग्निशमन दुचाकी आणल्या जाणाार आहेत. आग लागलेल्या ठिकाणी पाच मिनिटांत पोहोचण्याचे लक्ष्य अग्निशमन विभागाने ठेवले आहे. त्याशिवाय सहा नवीन उपकेंद्रे स्थापन केली जाणार आहेत. अग्निशमन जवानांना प्रशिक्षण देण्यात येत असून अत्याधुनिक सामग्रीचा समावेश केला जाणार आहे.
कुठेही आग लागली की वर्दी मिळताच पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचले पाहिजे, अशी अग्निशमन जीवरक्षक कायद्यात तरतूद आहे. त्याला रिस्पॉन्स टाइम असे म्हणतात. वसई विरार शहराची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. दाटीवाटीने वाढलेल्या वसाहती, अरुंद रस्ते आणि त्यात होणारी वाहतूक कोंडी यामुळे अग्निशमन दलाला पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचता येत नाही. सध्या वसई-विरार पालिकेच्या अग्निशमन दलाचा रिस्पॉन्स टाइम हा नऊ ते दहा मिनिटांचा आहे. आयुक्तांनीही अग्शिनमन विभागाचा आढावा घेताना हा रिस्पॉन्स टाइम पाच मिनिटांचा असल्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे आता अग्निशमन विभाग युद्धपातळीवर कामाला लागला आहे. कुठलीही आग ही सुरुवातीला छोटी असते. तात्काळ त्यावर नियंत्रण मिळवले तर ती रौद्र रूप धारण करत नाही. यासाठी आता मोठय़ा वाहनांबरोबर दुचाकीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने चार अग्निशमन दुचाकी (फायर बाईक) घेण्याचा निर्णय घेतला असून त्या लवकरच ताफ्यात दाखल होणार आहे.

कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण

अग्निशनम विभागातील कर्मचारी अधिक कार्यक्षम व्हावेत त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी नव्याने प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन तुकडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या पालिकेच्या अग्निशमन विभागात २२६ अग्निशमन जवान आणि कर्मचारी आहेत. शासकीय नियमानुसार नव्या अग्निशमन जवानांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहेत. त्यामुळे अधिक कर्मचारी विभागात दाखल होणार आहेत.

अग्शिनमन दुचाकी या आग विझविण्याच्या उपकरणांनी सुसज्ज असतील. आग लागल्याची वर्दी मिळताच या गाडय़ा तात्काळ घटनास्थळी पोहोचतील. त्या दुचाकी असल्याने त्याला वाहकूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. या गाडय़ा सहा अग्निशमन उपकेंद्रात ठेवल्या जाणार आहेत. त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यावर आणखी अग्निशमन दुचाकी मागविल्या जाणार आहेत.
भरत गुप्ता, अग्निशमन विभागचे प्रमुख.

सहा नवी अग्निशमन उपकेंद्र
सध्या वसई-विरार अग्निशमन विभागाकडे तीन मोठी आणि तीन छोटी अशी मिळून सहा अग्निशमन उपकेंद्र आहेत. पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणखी सहा अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय झाला आहे. ही केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.