आवक घटल्याने मासळीच्या दरांत दुप्पट वाढ

यंदाच्या रविवारी सुरमईचे झणझणीत कालवण किंवा पापलेट फ्राय बनवण्याचा फक्कड बेत करणार असाल तर, खिशात मोठा हात घालायची तयारी ठेवा. गेल्या काही दिवसांपासून आवक घटल्याने बाजारात मासळीचे दर दुप्पट महाग झाल्याचे दिसून येत आहे. सुरमई, पापलेट यांसारख्या खवय्यांच्या पसंतीच्या मासळीचे दर तर दुपटीहून अधिक वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वी २०० रुपयांनी मिळणारी लहान पापलेटची जोडी आता साडेचारशेच्या भावाने विकली जात असून एका मोठय़ा सुरमईलाही ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, ही मत्स्यटंचाई वाढण्याची शक्यता असून येत्या १५ दिवसांत मत्स्याहार अधिक महागण्याची चिन्हे आहेत.

मुंबई, ठाणे, डोंबिवली या परिसरात भाईंदर, कुलाबा, भाऊचा धक्का येथून आणल्या जाणाऱ्या माशांची विक्री केली जाते. मुळातच मासे कमी असल्याने भाव चढे असून मागणी अधिक असल्याची माहिती ठाण्यातील मच्छी विक्रेत्या भारती कोळी यांनी दिली. मासेमारी करताना मासे योग्य प्रमाणात जाळ्यात आले नाही तर समुद्रात भ्रमंती अधिक करावी लागते. यामुळे किनाऱ्याला येईपर्यंत मिळालेले मासेदेखील शिळे होत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई बंदर हे बोंबील माशांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु सध्या बोंबील माशांची आवकदेखील घटली असून ५० रुपयाला ५ छोटे बोंबील विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. महिन्याभरापूर्वी ५० रुपयाला १० या प्रमाणे हे बोंबील विकले जात होते. एक किलोची सुरमई साधारण १०००-१२०० रुपयांना विकली जात आहे तर मोठे पापलेट १५००-२००० रुपये किलोने तर मोठी कोलंबी १००० रुपये किलोने विकली जात आहे. कोलंबीची एक टोपली सध्या ८०० ते १००० रुपयांनी विकली जात असल्याची माहिती ठाण्यातील मच्छी विक्रेत्यांनी दिली. कोकणात झालेल्या पावसामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती उरण मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष जयविंद्र कोळी यांनी दिली.

आवक कमी कशामुळे?

  • हवामानात सातत्याने होणारे बदल हे एक कारण माशांची पैदास कमी होण्यामागे दिले जात आहे. थंडीचा कडाका वाढताच मासे समुद्रात खोलवर जातात. त्यामुळे जाळयात कमी येत असल्याचे मच्छीमार संघटनेचे म्हणणे आहे.
  • कोकणातील वेंगुर्ला, कुडाळ, रत्नागिरी येथे पडलेल्या रिमझिम पावसामुळे तसेच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात वातावरण ढगाळ असल्याने समुद्र थोडय़ा प्रमाणात खवळला आहे.
  • समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी, बोटीतून होणारी तेलगळती यामुळे होणाऱ्या सागरी प्रदूषणाचाही माशांवर परिणाम होत आहे.
  • गेल्या काही वर्षांत मासे पकडण्यासाठी ‘लाइट फिशिंग’चे प्रमाण वाढले आहे. मासे पकडण्यासाठी समुद्रात टाकण्यात आलेल्या जाळ्यांना विजेचा प्रवाह जोडण्यात येतो. अशा प्रकारच्या मासेमारीस सरकारने बंदी घातली असली तरी अजूनही हे प्रकार सुरू आहेत. त्याचा विपरीत परिणाम एकूणच मासेमारीवर दिसू लागला आहे.