वसई, उत्तन किनारपट्टीवर मच्छीमारांच्या नौका विसावल्या; समुद्रात आलेल्या मेकुणू वादळाचा फटका

समुद्रात आलेल्या मेकुणू वादळाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. या वादळाचा थेट फटका मासेमारी नौकांना बसला नसला तरी यामुळे समुद्रात मोठय़ा लाटा उसळल्याने ३१ मे ही मासेमारीची अंतिम मुदत असतानाही वसई तालुक्यातील आणि उत्तनमधील मासेमारी नौका मुदतीआधीच किनाऱ्याला लागल्या आहेत. यामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असते. १ जूनपासून बंदीचा कालावधी सुरू होतो. त्यामुळे मच्छीमार ३१ मेपर्यंत मासेमारी करतात आणि किनाऱ्याला परत येतात, परंतु यावेळी मेकुणू नावाचे वादळ समुद्रात घोंघावत होते. या वादळाचा फटका मुंबईच्या किनाऱ्याला बसण्याची शक्यता वर्तवली होती, परंतु वादळाने दिशा बदलल्याने ते दुसरीकडे निघून गेले. मात्र यामुळे समुद्रात अस्थिर वातावरण निर्माण झाले. २३ ते २६ मे या दरम्यान समुद्रात मोठय़ा लाटा उसळू लागल्या तसेच समुद्रदेखील खवळलेल्या अवस्थेत होता. अशा वातावरणात मासेमारी नौका समुद्रात ठेवणे धोक्याचे असते. त्यामुळे मच्छीमारांनी ३१ मेच्या मुदतीपर्यंत समुद्रात न थांबता किनाऱ्याला परतायचा निर्णय घेतला.

परिणामी उत्तन, पाली आणि चौक भागातील बहुतांश मासेमारी नौकांनी २५ मेपासून  किनाऱ्याला परतायला सुरुवात केली. एरवी ३१ मेची मुदत संपली की मासेमारी नौका किनाऱ्याला येतात आणि २ जूनपर्यंत त्या किनाऱ्यावरती ओढून घेण्यात येतात. यंदा मात्र ३० मे या दिवसापासूनच मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर ओढून घेण्यास सुरुवात केली आहे.

यंदाचा मासेमारीचा हंगाम नुकसानीत गेला असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरपासून ते आतापर्यंत समुद्रात चारवेळी वादळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याचा थेट फटका मासळी मिळण्यावर झाला. आतासुद्धा मे महिन्याच्या अखेरीस पापलेट मोठय़ा प्रमाणावर मिळत असते. पापलेटला बाजारात मोठी मागणी असल्याने मच्छीमार ३१ मेपर्यंत मासेमारी करतात. मात्र वादळामुळे किनाऱ्याला लवकर यावे लागल्याने मच्छीमारांचे नुकसान झाले, अशी माहिती विल्यम गोविंद यांनी दिली.

वादळामुळे बोटी किनाऱ्यावरच

भारतीय हवामान विभागाकडून वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मालवण ते वसई या किनाऱ्यावर ०३ ते ०३.२ मीटर उंचीच्या लाटा २४ मे रात्रीपर्यंत उसळण्याची शक्यता वर्तविली  होती. त्यासाठी मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ  नये, असा इशारा हवामाना खात्याने दिला होता. त्यानंतर लगेचच मासेमारीबंदी कालावधी ३१ मेपासून सुरू होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केल्याने वादळी वाऱ्यामुळे किनाऱ्यावर विसावलेल्या बोटी पुन्हा मासेमारीसाठी गेल्याच नसल्याचे मच्छीमार मिल्टन सौदीया यांनी सांगितले. या वादळी वाऱ्याच्या इशाऱ्यामुळे सर्वच नौका किनाऱ्यावर आल्या असून यामुळे मच्छीमारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचेही मच्छीमारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचेही ते म्हणाले. पावसाळ्यात मत्स्यप्रजातीसाठी हा प्रजननाचा काळ असतो. शिवाय वादळी वाऱ्यांचाही धोका असतो. यासाठी अडीच ते तीन महिने या कालावधीत मासेमारी बंद असते. त्यामुळे सध्या वसई, पाचूबंदर, अर्नाळा, कळंब, राजोडी, मर्सेस, खोचिवडे, पाणजू या भागातील मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर लावल्या आहेत.